मुख्यमंत्र्यांनी केरळमध्ये साधला कोंकणी संवादसेतू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2025 07:59 IST2025-02-24T07:59:11+5:302025-02-24T07:59:54+5:30
साहित्यिक, भाषाप्रेमींची घेतली भेट

मुख्यमंत्र्यांनी केरळमध्ये साधला कोंकणी संवादसेतू
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केरळ दौऱ्यावर एर्नाकुलम येथील अनुग्रह चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालविण्यात येणाऱ्या नर्मदा अनुग्रह या महिलांसाठीच्या मोफत आश्रमाला भेट दिली. या आश्रमातील निवासी तसेच तेथील समर्पित कर्मचारी आणि उदात्त कार्यात योगदान देणाऱ्या इतरांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांनी अनुग्रह चॅरिटेबल ट्रस्टने चालवलेल्या समाजसेवेचे तसेच ट्रस्टच्या 'मानव सेवा, माधव सेवा' या प्रेरणादायी ब्रीदवाक्याचे मनापासून कौतुक केले. जीवन उन्नती करण्याच्या ट्रस्टच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली आणि केरळमधील कोकणी गौड सारस्वत ब्राह्मण समुदायासह लोकांची सेवा करण्यात सतत यश मिळावे, यासाठी ट्रस्टला शुभेच्छा दिल्या.
वैद्यांच्या स्मारकाला भेट
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कोची येथे केरळातील महाक्षेत्र मानले जाणाऱ्या तिरुमला देवस्थानला भेट दिली तसेच सतराव्या शतकातील अप्पू भट, विनायक पंडित व रंगा भट या कोकणी वैद्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. या तिघांनी त्यावेळी 'हार्टस मालाबारीकस' या वनस्पतिविषयक ग्रंथाला योगदान दिले. या ग्रंथात विविध प्रजातींची ७०० हून अधिक रेखाचित्रे त्यांनी काढली होती.
साहित्य अकादमी विजेते नारायण मल्ल्या यांची घेतली भेट
केरळ दौऱ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक पद्मश्री नारायण पुरुषोत्तम मल्ल्या यांची त्यांच्या कोची येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मल्ल्या यांनी कोकणीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी चळवळ सुरू केल्याबद्दल त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. मल्ल्या यांनी कोकणीमध्ये अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि कोकणी भाषेचे समर्पित समर्थक म्हणून २००५ साली कोकणी भाषा प्रचार सभेने त्यांना 'कोंकणी पितामह' या पदवीने सन्मानित केले होते.
कोची येथे कोकणी भाषिकांशी चर्चा : 'मन की बात'मध्ये सहभाग
सावंत यांनी कोची येथील कोकणी भाषिकांसोबत संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमातही तेथूनच भाग घेतला. पंतप्रधानांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारताच्या उल्लेखनीय प्रगतीवर प्रकाश टाकला आहे. 'इस्रो'च्या शंभराव्या रॉकेट प्रक्षेपणाचा उत्सव साजरा केला, जो देशाच्या अंतराळ संशोधनातील वाढत्या पराक्रमाचा दाखला आहे. मेक एआय इन इंडिया, मेक एआय वर्क फॉर इंडिया या संकल्पनेद्वारे चालवलेल्या भारताच्या महत्त्वाकांक्षी एआय मिशनची रूपरेषाही पंतप्रधानांनी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या योगदानाचा गौरव करण्याविषयी सूचना पंतप्रधानांनी केल्या आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक पद्मश्री नारायण पुरुषोत्तम मल्ल्या यांची त्यांच्या कोची येथील निवासस्थानी भेट घेतली.