महिनाभर राबवणार स्वच्छता मोहीम
By Admin | Updated: October 3, 2015 03:36 IST2015-10-03T03:33:26+5:302015-10-03T03:36:03+5:30
पणजी : गांधी जयंतीनिमित्त शुक्रवारी राज्यभरातील विविध विद्यालयांमध्ये तसेच सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली.

महिनाभर राबवणार स्वच्छता मोहीम
पणजी : गांधी जयंतीनिमित्त शुक्रवारी राज्यभरातील विविध विद्यालयांमध्ये तसेच सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली. राजधानीतील पोलीस व इतर सरकारी खात्यांमध्ये शुक्रवारी स्वच्छता मोहीम पार पडली.
पोलीस मुख्यालय व पणजी पोलीस स्थानक परिसर तसेच आझाद मैदान येथे साफसफाईचे काम हाती घेतले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाची तसेच सभोवतीच्या परिसरात साफसफाई केली. येथे विनाकारण बिनउपयोगी पडून असलेले साहित्य हटविण्यात आले. एरव्ही लाठ्या व बंदूक हातात असणाऱ्या पोलिसांच्या हातात स्वच्छता मोहिमेच्यानिमित्त झाडू व खोरे दिसत होते.
राज्यातील विद्यालयांमध्ये १ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छता महिना म्हणून पाळला जाणार आहे. मनुष्यबळ विकास स्वच्छता महिना पाळण्यासाठी सांगितले आहे. त्याप्रमाणे शिक्षण खात्याच्या वतीने सगळ्या सरकारी व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांना परिपत्रक पाठवले आहे. हे परिपत्रक २९ सप्टेंबर रोजी जारी केले आहे. १ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान वर्ग, प्रयोगशळा, संग्रहालयांची साफसफाई करावी, तसेच विद्यालयांच्या सरभोवतीचा परिसर, मैदाने, स्टोअर रुम, स्वयंपाकघरे, शौचालय, पाणी पिण्याची जागा व विद्यालयातील बागेत स्वच्छता करावी लागणार आहे.
यानिमित्त काही विद्यालयांनी गुरुवारपासून स्वच्छता मोहिमा हाती घेतल्या आहेत, तर काही शाळांत गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम सुरू केली गेली आहे.
तसेच या स्वच्छता उपक्रमाचा अहवाल व फोटो शिक्षण खात्याला पाठवावा लागणार आहे. स्वच्छता व पोषक वातावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे आणि हाच उद्देश घेऊन ही स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
(प्रतिनिधी)