लेफ्टनंट गव्हर्नर दिवंगत मुल्कराज सचदेव यांच्या दुर्लक्षित समाधीस्थळी साफसफाई अन् आदरांजली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 21:46 IST2020-12-08T21:46:06+5:302020-12-08T21:46:27+5:30
समाधीवर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली.

लेफ्टनंट गव्हर्नर दिवंगत मुल्कराज सचदेव यांच्या दुर्लक्षित समाधीस्थळी साफसफाई अन् आदरांजली!
पणजी : गोवा, दमण, दीवचे दुसरे लेफ्टनंट गव्हर्नर दिवंगत मुल्कराज सचदेव यांच्या दुर्लक्षित समाधीस्थळी महापालिकेने हेरिटेज प्रेमी तसेच इतिहासप्रेमींच्या मागणीवरून साफसफाई करून काल मंगळवारी समाधीच्या ठिकाणी आदरांजलीचा कार्यक्रम घडवून आणला.
फ्रेंड्स ऑफ हिस्टॉरियन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव सरदेसाई, हेरिटेज ॲक्शन ग्रुपचे प्रजल साखरदांडे आदींनी यासाठी पुढाकार घेतला. सचदेव यांचे १९६४ साली गोव्यात लेफ्टनंट गव्हर्नर असताना निधन झाले होते. मिरामार येथे असलेल्या त्यांच्या समाधीच्या ठिकाणी झाडे-झुडुपे वाढली होती तसेच ही समाधी गेली अनेक वर्षे दुर्लक्षित होती. या समाधीवर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली.
पर्यटन विकास महामंडळाने समाधीस्थळाच्या ठिकाणी सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी आता पुढे येऊ लागली असून महापौर उदय मडकईकर यांनी याप्रसंगी बोलताना आपण ही मागणी महामंडळाकडे पाठवून पाठपुरावा करणार असल्याची तसेच समाधीस्थळे कायम स्वच्छता राहील याची खबरदारी घेण्याची ग्वाही दिली.लेफ्टनंट गव्हर्नर असताना सचदेव यांनी गोव्याचे प्रशासक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली. राजधानी शहराचा वारसा समृद्ध ठेवण्यासाठी यांचे महत्त्वाचे योगदान होते.