पाली-सत्तरीत दुर्मिळ रोग सापडल्याचा दावा
By Admin | Updated: April 14, 2015 02:04 IST2015-04-14T02:02:07+5:302015-04-14T02:04:00+5:30
पणजी : पाली-सत्तरी येथे सुरू असलेली साथ म्हणजे एक दुर्मिळ असा रोग आहे, असा प्राथमिक अहवाल मणिपाल इस्पितळाकडून आरोग्य खात्याला

पाली-सत्तरीत दुर्मिळ रोग सापडल्याचा दावा
पणजी : पाली-सत्तरी येथे सुरू असलेली साथ म्हणजे एक दुर्मिळ असा रोग आहे, असा प्राथमिक अहवाल मणिपाल इस्पितळाकडून आरोग्य खात्याला मिळाला असल्याचे उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पाली-सत्तरी येथे दोन महिन्यांत काहीजणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोकांना ताप येत आहे. काहींवर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. आरोग्य खात्याने गावात उपाययोजना सुरू केल्या आहेत. चिकनगुनिया, टायफॉईड, स्वाईन फ्लूसाठीच्या चाचण्या आरोग्य खात्याच्या यंत्रणेने करून पाहिल्या; पण त्या वेळी काही आढळले नाही.
या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१३) उपमुख्यमंत्री डिसोझा यांना विचारले असता, ते म्हणाले की, सोमवारीच मणिपाल इस्पितळाकडून अहवाल आला आहे. त्या अहवालात केएफडी म्हणजे माकड ताप (कॅस्नूर फॉरेस्ट डिसीझ) या दुर्मिळ अशा रोगाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. माकडांच्या अंगावर असलेल्या किट्टींपासून हा रोग होतो. त्याच रोगाची पालीमधील लोकांना लागण झाल्याचा संशय आहे; पण या रोगामुळे कुणाचा मृत्यू होत नाही.
डिसोझा म्हणाले, की पाली गावात ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यास पूर्णपणे केएफडी हाच रोग कारणीभूत आहे असे म्हणता येत नाही. तथापि, आता अहवाल आलेला असल्याने आपण पाली गावात अधिक जागृती करण्यास आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. कर्नाटकमध्ये माकडांपासून अशा प्रकारचा रोग होत असल्याची उदाहरणे आहेत. गोव्यात तशी उदाहरणे नाहीत. लोकांनी भयभीत होऊ नये. आम्ही निश्चितच यावर अधिक उपाययोजना करू.
(खास प्रतिनिधी)