पर्वरीत बेकायदा वृक्षतोड नागरिकांनी रोखली
By Admin | Updated: November 10, 2015 01:37 IST2015-11-10T01:37:08+5:302015-11-10T01:37:20+5:30
पर्वरी : येथील प्रभाग क्र. ८ मधील वनसंपदेतील सुमारे एक हजार चौरस मीटरच्या जंगलात ताळगाव येथील फोर आॅल

पर्वरीत बेकायदा वृक्षतोड नागरिकांनी रोखली
पर्वरी : येथील प्रभाग क्र. ८ मधील वनसंपदेतील सुमारे एक हजार चौरस मीटरच्या जंगलात ताळगाव येथील फोर आॅल डेव्हलपर्स या कंपनीने अचानक वृक्षतोड सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
तेथील नागरिकांनी हल्लाबोल करून वृक्षतोड थांबविण्याचा प्रयत्न केला; पण कंपनीने त्यांना जुमानले नाही. या वेळी पुंडलिक नगर रहिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहिले. त्यांनी पर्वरी पोलिसांना तातडीने बोलावले. निरीक्षक ब्रेंडन डिसोझा, उपनिरीक्षक सोमनाथ महाजिक यांनी पोलीस ताफ्यासह येऊन स्थिती आटोक्यात आणली. या वेळी आमदार रोहन खंवटे यांनीही घटनास्थळी येऊन काम थांबविण्यास सांगितले. तत्पूर्वी कंपनीचे अधिकारी हरून यांनी जमलेल्या नागरिकांना न जुमानता वृक्षतोड सुरूच ठेवली होती. आमदार खंवटे यांनी उपजिल्हाधिकारी पुंडलिक खोजुर्वेकर यांना कल्पना दिल्यानंतर वृक्षतोड थांबवली. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
वन खात्याचे अधिकारी राजेंद्र फातर्पेकर यांनी येऊन कापलेल्या वृक्षांची मोजणी करून पंचनामा केला. सुमारे शंभर वर्षांपूर्वीची झाडे डेव्हलपरने कापली. एकीकडे सरकार वनसंपदा राखा, पर्यावरण राखा, अशी जाहीर घोषणा करते आणि दुसरीकडे विकसकांना वनसंपदा नष्ट करण्यास मदत करते. या धोरणामुळे येथील नागरिक नाराज झाले असून येथील नागरिक आणि जीएचआरडीसीचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक मधुकर पळ यांनी पर्यावरणमंत्री राजेंद्र आर्लेकर यांना निवेदन देऊन पर्वरीतील वनसंपदा राखण्यासाठी तसेच झालेल्या वृक्षतोडीसंबंधी गंभीर
दखल घेण्याची विनंती करण्यात येईल, असे सांगितले.
या वेळी पुंडलिक नगर रहिवासी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद लवंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. पर्वरीत अनेक ठिकाणी अनधिकृत जंगलतोडीचे आणि बांधकामे चालू आहेत. सरकारी यंत्रणा कोणतेही ठोस पाऊल किंवा कारवाई करीत नसल्याचे दिसून येते. विधानसभा-सचिवालय पर्वरीतच आहे. पर्यावरणमंत्री तसेच पंचायतमंत्री
तेथे नेहमी येतात. त्यांनी पर्वरीत
एकदा फेरफटका मारावा, किती पर्यावरण राखले जाते ते त्यांच्या
सहज नजरेस येईल, असे संतप्त
उद्गार जमलेल्या रहिवाशांनी
या वेळी काढले. आमदार खंवटे
यांनी या प्रकाराची गंभीर दखल
घेतली असून अशी अनधिकृत कामे करू दिली जाणार नाही, असे सांगितले.