चर्चिल, रवी, सार्दिन काँग्रेसमध्ये नकोच!
By Admin | Updated: July 2, 2015 01:31 IST2015-07-02T01:31:13+5:302015-07-02T01:31:22+5:30
पणजी : चर्चिल आलेमाव यांना काँग्रेस पक्षात फेरप्रवेश दिला जाऊ नये, अशी जोरदार मागणी बहुतेक काँग्रेस आमदारांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत केली.

चर्चिल, रवी, सार्दिन काँग्रेसमध्ये नकोच!
पणजी : चर्चिल आलेमाव यांना काँग्रेस पक्षात फेरप्रवेश दिला जाऊ नये, अशी जोरदार मागणी बहुतेक काँग्रेस आमदारांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत केली. माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन आणि रवी नाईक यांना २०१७च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने उमेदवारी देऊ नये, अन्यथा काँग्रेसवर परिणाम होईल आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असे बहुतेक आमदारांनी बैठकीत स्पष्ट केले.
दिगंबर कामत, पांडुरंग मडकईकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, विश्वजित राणे हे आमदार बैठकीत सहभागी झाले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे अध्यक्षस्थानी होते. राणे यांच्या आल्तिनो येथीलच खासगी निवासस्थानी झालेल्या या बैठकीवेळी राणे हे चर्चिल किंवा रवी नाईक किंवा सार्दिनविरुद्ध काही बोलले नाहीत. चर्चिलला फेरप्रवेश देण्याचा विषय पक्षासमोर आहे असे आपल्याला वाटत नाही, असे राणे यांनी आमदारांना सांगून शांत केले. रेजिनाल्ड वगैरे काही आमदार चर्चिल, रवी, सार्दिनच्या विषयावर आक्रमक बनले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो हे चर्चिलला पक्षात पुन्हा आणू पाहत आहेत. २०१२ च्या निवडणुकीवेळी आम्हाला चर्चिल आलेमाव हे अत्यंत महागात पडले. जे नेते वयाने जास्त झालेत व ज्यांच्याविषयी वाद आहेत अशा नेत्यांना पक्षाने उमेदवारी दिली तर पुन्हा २०१७ सालीही जनता काँग्रेसला स्वीकारणार नाही, अशी खंत रेजिनाल्ड व अन्य काही आमदारांनी बैठकीत व्यक्त केली. रवी व सार्दिनलादेखील उमेदवारी देऊ नये. स्वत: फालेरो यांनी देखील काँग्रेसच्या उमेदवारीवर उभे राहणे हे काँग्रेससाठी मारक ठरेल, असे मत काहीजणांनी व्यक्त केले. विधानसभा अधिवेशनावेळी महागाई, वीज दरवाढ अशा विषयांवर सरकारला उघडे पाडावे, असे ठरले. (खास प्रतिनिधी)