चोर्लाघाट रस्ता १५ दिवसांत !
By Admin | Updated: May 12, 2014 00:38 IST2014-05-12T00:34:23+5:302014-05-12T00:38:48+5:30
चोर्लाघाट रस्ता १५ दिवसांत !

चोर्लाघाट रस्ता १५ दिवसांत !
चोर्लाघाट : गोवा ते बेळगाव व्हाया चोर्लाघाट मार्गावरील गोव्याची सीमा ते साखळीपर्यंतच्या एकूण २३ कि.मी. रस्त्याचे हॉटमिक्सिंग डांंबरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. चोर्ला घाटातील गोवा सीमेवर रविवारी राष्ट्रीय महामार्ग जोडणींतर्गत केंद्राकडून मिळालेले सुमारे दहा कोटी खर्च करून करण्यात येणार्या हॉटमिक्सिंग डांंबरीकरणाच्या शुभारंभप्रसंगी ढवळीकर बोलत होते. या वेळी विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे, आमदार प्रमोद सावंत, केरीचे सरपंच जिवबाराव राणे, मोर्लेचे सरपंच कृष्ठा गावकर, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता रेगो व इतर अधिकारी उपस्थित होते. ढवळीकर म्हणाले की, चोर्लाघाट रस्त्यासाठी केंद्राकडून निधी मंजूर झाला. तसेच दोडामार्ग-अस्नोडा तसेच दोडामार्ग ते डिचोली या रस्त्याचे कामही केंद्राकडून मिळालेल्या निधीतून करण्यात येणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होईल. प्रतापसिंह राणे म्हणाले की, चोर्लाघाट रस्ता हे आपले १९७२ पासूनचे स्वप्न होते. १९८0 मध्ये आपण या कामाला चालना दिली व पाच वर्षांत रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे गोवा व कर्नाटकाला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा निर्माण झाला. त्यानंतर २00६ मध्ये आपण मुख्यमंत्री असताना या रस्त्याचे पुन्हा काम केले होते. आमदार सावंत यांनी या रस्त्याचे काम हाती घेतल्याबाबत मंत्री ढवळीकर व मुख्यमंत्री पर्रीकर यांचे आभार मानले. तसेच हा रस्ता सत्तरी, डिचोली व गोव्याच्या विकासाला गती देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. आरंभी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर मंत्री ढवळीकर, राणे व सावंत यांच्या हस्ते डांबरीकरणाचा शुभारंभ झाला. या वेळी केरी व आसपासच्या भागातील नागरिक उपस्थित होते. (खास प्रतिनिधी)