चिनी निर्माते वाँग कार-वॉयना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार
By Admin | Updated: November 15, 2014 02:05 IST2014-11-15T01:55:42+5:302014-11-15T02:05:24+5:30
पणजी सजतेय : देश-विदेशांतील कलाकारांची उपस्थिती लाभणार

चिनी निर्माते वाँग कार-वॉयना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार
पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी राजधानी पणजी सजू लागली आहे. येत्या गुरुवारी इफ्फीचा पडदा उघडला जाणार असून, माहोल तयार होऊ लागला आहे. महोत्सवात चीनचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते वाँग कार-वॉय यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन इराणी चित्रपट ‘मोहसेन माकालबग’ या चित्रपटाने होणार आहे. या वेळी चिनचे चित्रपट निर्माते झाँग जिझी, स्विडनचे चित्रपट निर्माते जॅनट्रोईल, पोलँडचे कारजिस्ट झनुसी हे उपस्थित असणार आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिद्ध कलाकार अभिताभ बच्चन यांच्या हस्ते यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तर दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत (शिवाजी गायकवाड) हेही सोहळ्याला उपस्थित असतील. चित्रपट निर्माते वाँग कारवाय यांच्या चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होणार आहे.
यंदाच्या खास सिंहवलोकनात्मक विभागात गुलझार व जाहानु बरुआवर आधारित चित्रपट होणार आहेत. विशेष आदर विभागात रिचर्ड एॅटनबरो, रॉबिन विल्यम, जोहरा सहगल व सुचित्रा सेन यांच्यावर चित्रपट दाखविण्यात येतील. खास खंडणी विभागात फारुख शेख यांच्यावरील चित्रपट झळकणार आहेत. त्या व्यतिरिक्त नृत्य, व्यक्तिमत्त्व आधारित कार्यशाळा, मास्टरक्लास इत्यादी आकर्षणे इफ्फीत दिसणार आहेत.
बारा हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधींची आतापर्यंत नोंदणी झाली आहे. मंगळवारपर्यंत मिळून एकूण पंधरा हजार प्रतिनिधींची नोंदणी होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना इफ्फीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यात चिनी, जपानी, आशियायी, बरोबरच कन्नड, मल्याळम्, मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती असेल. रेडकार्पेटसाठी खास व्यवस्था करण्यात आली असून, मोजके आणि प्रसिद्ध कलाकार रेडकार्पेटवर झळकणार आहेत, असे महोत्सव संचलनालयाच्या सूत्रांनी सांगितले.
(प्रतिनिधी)