राज्य युवा महोत्सवाच्या मुख्य संयोजकाला अचानक हटविले
By Admin | Updated: December 8, 2015 01:18 IST2015-12-08T01:18:12+5:302015-12-08T01:18:12+5:30
पणजी : राज्य सरकारच्या युवा व क्रीडा व्यवहार खात्याच्या युवा महोत्सवात योजना प्रमुख व शिष्टाचार अधिकारी म्हणून

राज्य युवा महोत्सवाच्या मुख्य संयोजकाला अचानक हटविले
पणजी : राज्य सरकारच्या युवा व क्रीडा व्यवहार खात्याच्या युवा महोत्सवात योजना प्रमुख व शिष्टाचार अधिकारी म्हणून काम पाहणारे लक्ष्मीदास मंगेशकर यांना दोन जिल्हा महोत्सवांचे यशस्वीरीत्या आयोजन केल्यानंतर व अंतिम फेरी आठ दिवसांवर येऊन ठेपली असताना अचानकपणे महोत्सव आयोजनातून दूर करण्यात आल्याने युवकांमध्ये असंतोष पसरला आहे.
सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, साखळी व काणकोण येथे जिल्हानिहाय युवा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडले. आता अंतिम फेरी मडगावच्या रवींद्र भवनात १५ व १६ डिसेंबर रोजी
होणार आहे. परंतु, अंतिम फेरीच्या आयोजनातून मंगेशकर यांना कोणतेही कारण न देता काढून टाकण्यात आले
आहे. खात्यात मंगेशकर हे सहाय्यक संचालक पदावर आहेत.
काणकोण येथे युवा महोत्सवाच्यावेळी मंगेशकर यांच्याबद्दल क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी आक्षेप घेतला होता. एका प्रत्यक्षदर्शीने या प्रतिनिधीला सांगितले की, कार्यक्रम संपल्यावर मंत्री तवडकर यांनी खातेप्रमुखांना मी सांगताना पाहिले
की, हा माणूस (मंगेशकर) मला पुढच्या कार्यक्रमात दिसता कामा नये. युवा महोत्सवाच्या राज्य संयोजन समितीचे एक सदस्य सुरेल तिळवे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना झालेल्या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मंगेशकर यांचे मंत्र्यांशी काय झालेय, ते मला माहीत नाही; परंतु अंतिम फेरी अवघ्या आठवड्यावर आलेली असताना मंगेशकर यांना तडकाफडकी व योग्य कारण न देता असे बाजूला काढणे योग्य नाही. ‘आमच्या समितीला त्यासाठी योग्य कारणे द्यायला हवी होती. ती न देता मुख्य संयोजकालाच काढून टाकले गेले आहे. त्यामुळे
आम्हीही आता आयोजन समितीवर राहायचे काय, याचा विचार करीत आहोत,’
अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
(विशेष प्रतिनिधी)