बाबूश मोन्सेरात यांच्यावरील आरोप कायम
By Admin | Updated: September 13, 2014 01:32 IST2014-09-13T01:31:12+5:302014-09-13T01:32:28+5:30
बार्देस : पणजी पोलीस स्थानकावर १९ फेब्रुवारी २००८ रोजी झालेल्या हल्लाप्रकरणी सांताक्रुझ मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बाबूश मोन्सेरात

बाबूश मोन्सेरात यांच्यावरील आरोप कायम
बार्देस : पणजी पोलीस स्थानकावर १९ फेब्रुवारी २००८ रोजी झालेल्या हल्लाप्रकरणी सांताक्रुझ मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आपल्याविरुद्धचे आरोपपत्र रद्द करण्याची केलेली विनंती म्हापसा येथील सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे मोन्सेरात हे मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोन्सेरात यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यासाठी हल्ला प्रकरण हे योग्य आहे, असे निरीक्षण सीबीआय न्यायालयाने नोंदवले आहे. मोन्सेरात व अन्य संशयित आरोपी शुक्रवारी सीबीआय न्यायालयात हजर होते. मोन्सेरात, त्यांची पत्नी व ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, पणजीचे माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज यांच्यासह पस्तीसजणांनी पणजी पोलीस स्थानकावर मोर्चा काढून हल्ला केला व पोलिसांना जखमी केले, असा आरोप आहे.
सीबीआयने सादर केलेल्या आरोपपत्रास माजी मंत्री मोन्सेरात यांनी एका अर्जाद्वारे आव्हान दिले होते. आपल्यासह इतरांविरुद्धचे आरोप रद्द केले जावेत, अशी विनंती मोन्सेरात यांनी केली होती. ती पूर्ण झाली नाही. आता येत्या २३ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मोन्सेरात यांच्या वतीने अॅड. अरुण डिसा हे काम पाहत आहेत, तर सरकारच्या वतीने अॅड. कमरपालसिंग हे काम पाहत आहेत.
या हल्लाप्रकरणी मोन्सेरात यांना अटकही झाली होती. आपल्याला व पत्नीला तसेच टोनी रॉड्रिग्ज यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व आपला मिरामार येथील बंगलाही पोलिसांनी फोडल्याचा दावा त्या वेळी मोन्सेरात यांनी केला होता. दरम्यान, येत्या २३ रोजी नेमके कोणते आरोप निश्चित केले जातात, ते आम्ही पाहू व त्यानंतर पुढील भूमिका ठरवू, एवढेच मोन्सेरात यांनी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)