‘चपाला’ चक्रीवादळाने बरसला पाऊस...
By Admin | Updated: November 1, 2015 01:56 IST2015-11-01T01:56:31+5:302015-11-01T01:56:51+5:30
पणजी : अरबी समुद्रात ‘चपाला’ नामक चक्रीवादळ तयार झाले असून ते वेगाने ओमानच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे शनिवारी रात्री गोव्यासह

‘चपाला’ चक्रीवादळाने बरसला पाऊस...
पणजी : अरबी समुद्रात ‘चपाला’ नामक चक्रीवादळ तयार झाले असून ते वेगाने ओमानच्या दिशेने मार्गक्रमण करीत
आहे. त्यामुळे शनिवारी रात्री गोव्यासह
इतर राज्यांतील किनारपट्टीच्या भागांत जोरदार वृष्टी झाली.
मडगाव, फोंडा, पणजीसह राज्याच्या अनेक भागांत पाऊस कोसळला. त्यामुळे रात्री वाहने घेऊन बाहेर पडलेल्यांची
गैरसोय झाली. जोरदार वाहणारे वारे, विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटामुळे सायंकाळीच पावसाची शक्यता निर्माण झाली होती. रात्री उशिरापर्यंत विविध भागांत कमी-अधिक प्रमाणात वृष्टी सुरू होती.
मुंबईपासून सुमारे १६५० किलोमीटर दूर अरबी समुद्रात हे चक्रीवादळ तयार झाले असून ते वायव्येच्या दिशेने सरकत आहे. हे चक्रीवादळ ओमानच्या किनारपट्टीला धडकण्याची चिन्हे असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. तूर्त या चक्रीवादळाचा वेग ताशी १६ किलोमीटर आहे; परंतु हा वेग वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. या चक्रीवादळाचे ‘चपाला’ असे नामकरणही करण्यात आले आहे.
भारतीय किनाऱ्याला हे वादळ धडकणार नसले, तरी त्याचा प्रभाव मात्र भारतीय किनारपट्टीवरील भागात जाणवला. केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टी भागात संमिश्र प्रमाणात पाऊस पडला.
(प्रतिनिधी)