कोयत्याचा धाक दाखवून बाणावलीत जबरी चोरी
By Admin | Updated: May 14, 2014 07:16 IST2014-05-14T00:47:56+5:302014-05-14T07:16:56+5:30
मडगाव : सासष्टीत चोर्यांचा उच्छाद वाढला असून बाणावली व मडगाव येथे शस्त्राचा धाक दाखवून चोर्या करण्याच्या घटना घडल्या.

कोयत्याचा धाक दाखवून बाणावलीत जबरी चोरी
मडगाव : सासष्टीत चोर्यांचा उच्छाद वाढला असून बाणावली व मडगाव येथे शस्त्राचा धाक दाखवून चोर्या करण्याच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे या दोन्ही चोर्या दिवसा झाल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. बाणावली येथील मोती डोंगरावरील सेंट बाप्तीस्त चर्चला लागून असलेल्या कार्यालयात मंगळवारी भरदिवसा चोरी झाली. बुरखा घालून आलेल्या एका दांपत्याने या कार्यालयात असलेल्या दोन युवतींना कोयत्याचा धाक दाखवून त्यांना प्रसाधनगृहात बंद करून दहा हजार रुपये रोख, एक लॅपटॉप व दोन मोबाईल चोरून नेले. भरदिवसा झालेल्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत्त अभियंते जनार्धनन यांच्या घरी मडगावात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता चोरी झाली. त्यांच्या पत्नी देवी जनार्धनन (५४) या घरी एकट्याच असताना एक व्यक्ती त्यांच्या घरी आली. त्याने चाकूचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. या वेळी देवी यांनी प्रतिकार केल्याने चोरट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांच्या हाताला जखम झाली. त्यांच्या हातात असलेल्या सोन्याच्या बांगड्या, तसेच देवघरातील सोन्याची नाणी असा सुमारे दोन लाखांचा ऐवज घेऊन तो चोरटा पसार झाला. मिळालेल्या माहितीप्रमाणे, एका दिवसापूर्वी हा चोरटा जनार्धनन यांच्या घरी आला होता. त्याने त्यांच्या पत्नीला ‘दादा कुठे गेले,’ असा प्रश्न विचारला होता. कदाचित हा चोरटा आपल्या पतीबद्दल विचारत असावा, असे समजून त्यांनी ते पोस्टात गेले आहेत, असे सांगितले. मंगळवारी सकाळी ६ पासून हा चोरटा जनार्धनन यांच्या घरावर पाळत ठेवून होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. मडगाव पोलिसांनी श्वानपथकाच्या साहाय्याने चोरट्याचा माग घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. बाणावलीत ज्या ठिकाणी चोरी झाली तेथे श्वानपथक आणण्यास पोलिसांना तब्बल पाच तास लागले. दुपारी बारा वाजता चोरी झाली होती. मात्र, श्वानपथक सायंकाळी साडेपाच वाजता घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी) (पान २ वर)