बफर झोनमध्येही सिमेंटची ‘जंगले’!

By Admin | Updated: January 16, 2016 01:50 IST2016-01-16T01:50:16+5:302016-01-16T01:50:16+5:30

पणजी : इको टुरिझमच्या नावाखाली बफर झोनमध्ये बांधकामांना मार्ग मोकळा करणारे नगर नियोजन कायदा दुरुस्तीचे वादग्रस्त विधेयक विधानसभेत

Cement's 'forest' in buffer zone! | बफर झोनमध्येही सिमेंटची ‘जंगले’!

बफर झोनमध्येही सिमेंटची ‘जंगले’!

पणजी : इको टुरिझमच्या नावाखाली बफर झोनमध्ये बांधकामांना मार्ग मोकळा करणारे नगर नियोजन कायदा दुरुस्तीचे वादग्रस्त विधेयक विधानसभेत संमत करण्यात आले. या विधेयकाला विरोधी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सुचविलेल्या दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या. या वेळी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेत्यांसह विरोधी सदस्यांनी सभात्याग केला आणि या गदारोळातच हे विधेयक संमत करण्यात आले.
नगर नियोजन मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी हे विधेयक मांडले असता, त्यास काडाडून विरोध करण्यात आला. पर्यावरणावर हा घाला असल्याचे आमदार रोहन खंवटे म्हणाले. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील विभागांशी सरकार खेळत आहे. उद्या सीआरझेडमध्येही बांधकामे येतील. सखल भाग मातीने बुजवून बांधकामे केली जातील. आज एखाद्या जमीनमालकाला एकूण जमिनीच्या केवळ ५ टक्के भागात इको टुरिझम प्रकल्प उभारण्यासाठी परवानगी देण्यात येत असली, तरी त्याचा दुरुपयोग होणार नाही कशावरून? या कायद्यात ४२ अ या नव्या कलमाची गरजच काय, असा सवाल खंवटे यांनी केला व विधेयक चिकित्सा समितीकडे पाठविण्याची मागणी त्यांनी केली. आमदार पांडुरंग मंडकईकर यांनी सरकारच्या हेतूवर संशय व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: Cement's 'forest' in buffer zone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.