कॅसिनो, हॉटेल्स, बारबाहेर अल्कोमीटर
By Admin | Updated: July 24, 2014 01:27 IST2014-07-24T01:26:05+5:302014-07-24T01:27:26+5:30
पणजी : कॅसिनो, मोठी हॉटेल्स व बारमधून परतणाऱ्यांची अल्कोमीटर चाचणी घेण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर

कॅसिनो, हॉटेल्स, बारबाहेर अल्कोमीटर
पणजी : कॅसिनो, मोठी हॉटेल्स व बारमधून परतणाऱ्यांची अल्कोमीटर चाचणी घेण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिली. दारूच्या नशेत त्यांनी वाहने चालवू नयेत, यासाठी ही खबरदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
दारूच्या नशेत वाहने चालवून स्वत: अपघातात सापडणे आणि दुसऱ्यांचा जीवही घेण्याचे प्रकार वाढू लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हॉटेल, मद्यालये किंवा कॅसिनोतून बाहेर आलेल्या लोकांची अल्कोमीटर लावून चाचणी केल्यावर सर्वच दारूच्या नशेत आढळले आणि त्यांचा वेगळा (दारू न पिलेला) चालक नसला, तर त्यांना गाडी चालवू दिली जाणार नाही किंवा त्यांना घरी पोहोचविण्याची जबाबदारी बारमालकाला दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मद्यालयांची वेळ हल्लीच वाढविण्यात आली होती. विशेष शुल्क भरून रात्री ११ नंतर मद्यालये चालविण्यासाठी मुभा देण्यात आली होती. या निर्णयाला राज्यभर विरोध झाला होता. विशेषकरून महिला व महिला संघटनांनी विरोध केला होता. या निर्णयावर आता फेरविचार होणार असून अशा मद्यालयांवर निर्बंध आणले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मद्यालयांची वेळ वाढविण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध प्रसारमाध्यमांतूनही तीव्र टीका झाली होती. पाटो-पणजी येथील ‘डाउन द रोड’ पबजवळ झालेल्या तलवार हल्ला प्रकरणानंतर तर हा विषय अधिक ताणून धरण्यात आला होता. बुधवारी सभागृहात या विषयावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी, प्रसारमाध्यमांनी हा विषय आपल्या लक्षात आणून दिल्याचे सांगितले.
(प्रतिनिधी)