धारगळ येथील युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: November 27, 2015 01:30 IST2015-11-27T01:30:08+5:302015-11-27T01:30:17+5:30
पणजी : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्याच्या प्रकरणात धारगळ येथील गजानन पाडलोसकर (२५) याच्याविरुद्ध

धारगळ येथील युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
पणजी : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्याच्या प्रकरणात धारगळ येथील गजानन पाडलोसकर (२५) याच्याविरुद्ध पणजी महिला पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विवाह नोंदणीची पहिली स्वाक्षरी झाल्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला. त्यामुळे मुलीने पणजी महिला पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविला. युवक हा धारगळ येथील असून पणजीतील एका हॉटेलमध्ये तो रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतो, तर पीडित युवती ही उत्तर गोव्यातीलच आहे. पीडित मुलीशी त्याचे दोन वर्षांपासून संबंध होते. दरम्यानच्या काळात तिला त्याच्यापासून दिवसही गेले होते. त्यानंतर ६ नोव्हेंबर ही लग्नाची तारीखही ठरली होती आणि त्यासाठी उपनिबंधकाच्या कार्यालयात विवाह नोंदणीसाठी दोघांची पहिली स्वाक्षरीही झाली होती; परंतु दुसऱ्या स्वाक्षरीपूर्वी संशयिताने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन लग्नाला नकार दिला.
या घटनेमुळे धास्तावून जाऊन त्या युवतीने पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली. पणजी महिला पोलीस स्थानकात पाडलोस्कर याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा आणि ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पीडित युवती पोलीस स्थानकात तक्रार नोंदविणार याची कल्पना संशायिताला होती, त्यामुळे त्याने त्यापूर्वीच अटकपूव जामिनासाठी अर्ज केला होता. म्हापसा सत्र न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूरही केला. त्यामुळे पोलीस त्याला अटक करू शकले नाहीत. गुन्हा नोंदविण्यापूर्वी त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. त्यामुळे पीडितेच्या वतीने बाजू मांडण्यात आली नव्हती. आता हा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे महिला पोलिसांकडून सांगण्यात आले.