'एक है, तो सेफ है' घरोघरी पोहोचवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2024 12:41 IST2024-12-04T12:37:05+5:302024-12-04T12:41:10+5:30
फोंडा येथे ज्येष्ठ कीर्तनकार सुहास बुवा वझे यांचा सत्कार

'एक है, तो सेफ है' घरोघरी पोहोचवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : आज देशासमोर जी आव्हाने निर्माण झाली आहेत, त्याचा परामर्श घेता देश, देव आणि धर्मासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. जाती व्यवस्थेच्या भिंती भेदून आज 'एक है तो सेफ है' हा मंत्र घराघरात पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. सुहास बुवा वझे यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
व्यासपीठावर वीजमंत्री सुदिन ढवळीकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. शिरीष बोरकर, उद्योजक मोहनदास बखले, कीर्तन महाविद्यालयाचे देवानंद सुर्लकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, की कीर्तनकला ही एकेकाळी काही विशिष्ट लोकांपुरती मर्यादित होती, परंतु सुहास वझे यांनी परिघाबाहेर विचार करताना सामान्य कुटुंबातील मुलांना कीर्तन शिकवले. त्या सामान्य कुटुंबांच्या माध्यमातून आज कीर्तन जातीपातीच्या भिंती भेदून पुढे गेले आहे. त्यांनी कीर्तनात क्रांती केली व कीर्तनात परिवर्तन घडवून आणले. त्यामुळेच आज कीर्तनाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. आज कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरामध्ये गर्दी होऊ लागली आहे. त्याचे श्रेय वझेबुवांना जाते.
पैसा हे सर्वस्व नसल्याची प्रचिती येऊ लागली आहे. कारण लाखो रुपये पगार असलेली माणसेही आत्महत्या करतात. अशा लोकांना मनःशांती प्राप्त करून देण्यासाठी कीर्तन हे चांगले माध्यम आहे. आजच्या युगात लोकांनी मनःशांतीसाठी तरी कीर्तनाचे साहाय्य घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी अनिल सामंत म्हणाले, की सुविद्य, सुरक्षित, सुनियंत्रित, सुसंस्कृत आणि स्वानंदी गोवा ही पंचसूत्री आज गोव्याला योग्य दिशेने नेऊ शकते. त्यासाठी लहान मुलांवर आतापासूनच हे सूत्र बिंबवण्याची गरज आहे. ते काम कीर्तनाच्या माध्यमातून परिणामकारकरित्या होऊ शकेल. संजय घाटे यांनी प्रास्ताविक केले. नेहा उपाध्ये व गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले.
साखळीत होणार कीर्तन विद्यालय
मुख्यमंत्री म्हणाले, की प्रत्येक मंदिरामधून कीर्तनाची परंपरा जोपासली गेली पाहिजे. मी पहिल्यांदा आमदार झालो, त्यावेळी मतदारसंघातील प्रत्येक मंदिरामध्ये कीर्तने सुरू करण्याचा प्रयत्न केला. आज त्या प्रयत्नाला यश आले आहे. कीर्तनाची परंपरा नव्या पिढीने पुढे घेऊन जावी, म्हणून गोव्यात लवकरच कीर्तन महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पहिले कीर्तन विद्यालय साखळी येथील रवींद्र भवनमध्ये सर्वांच्या सहकार्याने लवकरच सुरू होईल.