लाचखोर वाहतूक अधिकारी जाळ्यात
By Admin | Updated: July 8, 2015 01:40 IST2015-07-08T01:40:07+5:302015-07-08T01:40:21+5:30
पणजी : वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक उदय गावस आणि साहाय्यक मोटार वाहतूक निरीक्षक एम. व्ही. उम्रसकर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात

लाचखोर वाहतूक अधिकारी जाळ्यात
पणजी : वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक उदय गावस आणि साहाय्यक मोटार वाहतूक निरीक्षक एम. व्ही. उम्रसकर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात
आले. पाटो-पणजी येथील एका हॉटेलमध्ये भ्रष्टाचारविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत कंत्राटदाराकडून ९० हजार रुपये लाच स्वीकारताना या दोघांना अटक करण्यात आली.
फोंडा येथील आरआयएम लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे भागीदार असलेले राजीव राजन सिंग यांनी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे केलेल्या तक्रारीवरून ही लाचखोरी उघडकीस आली आहे. आंतरराज्य वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सिंग यांच्या कंपनीकडून परवानगीसाठी अर्ज केला होता; परंतु या अर्जाचा विचार करण्यात आला नव्हता. वाहतूक खात्याच्या पणजी कार्यालयातील साहाय्यक संचालक उदय गावस यांनी त्यांची फाईल अडवून ठेवली होती. परवाना हवा असेल, तर दीड लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. तशी सूचना त्यांनी साहाय्यक मोटार वाहतूक निरीक्षक एम. व्ही. उम्रसकर यांच्यामार्फत अर्जदार सिंग यांना केली होती.
सिंग यांनी वाहतूक अधिकारी आपल्याकडे लाच मागत असल्याची माहिती भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिली. तशी रीतसर तक्रारही नोंदविली. त्यानंतर एसीबीकडून सापळा रचून या दोघाही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पाटो-पणजी येथील एका हॉटेलमध्ये हे डील केले जात असतानाच पोलिसांनी छापा टाकून पुराव्यासह दोघांनाही अटक केली. ९० हजार रुपये रक्कमही जप्त करण्यात आली.
डील करण्यासाठी हे अधिकारी वाहतूक खात्याचीच जीप घेऊन आले होते. सिंग यांनी संकेत देताच एसीबीचे अधिकारी हॉटेलमध्ये घुसले आणि त्यांना पकडले. पकडण्यात आल्यानंतर दोघेही संशयित आणि त्यांच्या जीपचे चालक अशा तिघांनाही संस्कृती भवनातील एका खोलीत नेण्यात आले. त्या ठिकाणी चार तास चौकशी सुरू होती. एसीबीचे उपअधीक्षक बोसुएट सिल्वा आणी नोलास्को रापोझ त्यांची चौकशी करत होते. भ्रष्टाचारविरोधी कायदा कलम ७, १३ (१) (डी) आणि १३ (२) अंतर्गत दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)