प्रचंड टीकेनंतर गोव्याचे मंत्री स्वखर्चाने जाणार ब्राझिलला
By Admin | Updated: June 13, 2014 14:30 IST2014-06-13T14:30:22+5:302014-06-13T14:30:35+5:30
गोव्याचे मंत्री सरकारी खर्चाने ब्राझिलमध्ये फूटबॉल वर्ल्ड कपचे सामने बघायला जाणार यावरून झालेल्या प्रचंड टीकेमुळे अखेर या आमदारांनी नमते घेत या ट्रिपचा खर्च स्वत:च करणार असल्याचे जाहीर केले आहे.

प्रचंड टीकेनंतर गोव्याचे मंत्री स्वखर्चाने जाणार ब्राझिलला
ऑनलाइन टीम
पणजी, दि. १३ - गोव्याचे मंत्री सरकारी खर्चाने ब्राझिलमध्ये फूटबॉल वर्ल्ड कपचे सामने बघायला जाणार यावरून झालेल्या प्रचंड टीकेमुळे अखेर या आमदारांनी नमते घेत या ट्रिपचा खर्च स्वत:च करणार असल्याचे जाहीर केले आहे. फिफाच्या वर्ल्ड कपमधील शेवटचे काही सामने बघण्यासाठी गोवा सरकार सुमारे ८७ लाख रुपये खर्च करून सहा आमदारांना पाठवणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, दोनच दिवसात त्यांच्यावर टिकेचा प्रचंड भडीमार झाला. अर्जुन पुरस्कार विजेत्या फुटबॉलपटूंना वगळून आमदारांना पाठवण्यात काय मतलब असा सवाल विविध स्तरांवर उठवण्यात आला. अखेर काल संध्याकाळी आम्ही एकत्र बैठक घेतली व या दौ-याचा खर्च आमचा आम्हीच करायचे ठरवले असे स्पष्टीकरण सहा आमदारांच्या वतीने मत्स्योद्योग मंत्री अव्हर्तानो फुर्ताडो यांनी दिले आहे.
दरम्यान, ब्राझिलच्या अभ्यास दौ-यासाठी करण्यात येणा-या या खर्चाबाबत प्रसारमाध्यमांनी चुकीची टीका केल्याचा आरोप गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला आहे. राजकारणाबाबत यातून एक अत्यंत चुकीची प्रतिमा प्रसारमाध्यमांनी केल्याचे पर्रीकर म्हणाले. फुटबॉल हा पर्यटनाचा उत्सव आहे. ज्यावेळी २०१७ मध्ये आम्ही अंडर - १७ वर्ल्डकप भरवू त्यावेळी आत्ता करण्यात येणा-या खर्चाच्या अनेकपट उत्पन्न सरकार मिळवेल असे त्यांनी सांगितले. अर्थात, आता या मंत्र्यांनी स्वखर्चाने ब्राझिलला जातो असे सांगत या वादावर पडदा टाकला आहे.