लाच स्वखुशीने नव्हे, सक्तीने!
By Admin | Updated: August 2, 2015 03:19 IST2015-08-02T03:19:29+5:302015-08-02T03:19:29+5:30
पणजी : जैका प्रकल्पासाठी लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीकडे लाच मागण्यात आली होती आणि जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर

लाच स्वखुशीने नव्हे, सक्तीने!
पणजी : जैका प्रकल्पासाठी लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीकडे लाच मागण्यात आली होती आणि जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांनी त्यासाठी कंपनीवर दबाव आणला होता, असे क्राईम ब्रँचने पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर नोंदवून घेतलेल्या तिसऱ्या जबाबानंतर उघड झाले आहे.
लाच देण्यासाठी लुईस बर्जरच्या अधिकाऱ्यांना वाचासुंदर यांनी प्रवृत्त केले. त्यासाठी दबावतंत्राचाही वापर करण्यात आला. दोन मंत्र्यांचे ‘मेसेंजर’ म्हणूनही त्यांनी काम केले. सातत्याने दबाव आणल्यामुळे लाच द्यावी लागली, असे क्राईम ब्रँचच्या तपासातून उघड झाले आहे. फौजदारी दंड संहिता कलम १६४ अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या तिसऱ्या जबाबानंतर ही माहिती उघडकीस आली आहे. क्राईम ब्रँचकडून शुक्रवारी शहा कन्सल्टन्सीच्या अधिकाऱ्यांचा या प्रकरणात जबाब नोंदविण्यात आला होता. यापूर्वी लुईस बर्जर कंपनीच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून जबाब नोंदविण्यात आला होता. त्या जबाबात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी लाच घेतल्याचे म्हटले होते. आता शहा कन्सल्टन्सीच्या अधिकाऱ्यांच्या जबाबातूनही या आरोपांना पुष्टी मिळाली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील तपासाला वेग
आला असून तपास अधिकारी दत्तगुरू सावंत
यांनी संशयितांचे जबाब नोंदविण्याचा
धडाका लावला आहे.
आतापर्यंत १६ अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. त्यातही ३ संशयितांचे जबाब हे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविण्यात आल्यामुळे या प्रकरणात दिगंबर कामत व चर्चिल आलेमाव यांना क्राईम ब्रँचकडून केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)