‘रुबी’प्रकरणी दोन्ही बिल्डर अटकेत

By Admin | Updated: January 17, 2015 03:01 IST2015-01-17T03:00:18+5:302015-01-17T03:01:51+5:30

मुंबईत कारवाई : गोवा क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांची कारवाई

Both builders are accused in the Ruby case | ‘रुबी’प्रकरणी दोन्ही बिल्डर अटकेत

‘रुबी’प्रकरणी दोन्ही बिल्डर अटकेत

पणजी : काणकोण येथील रुबी दुर्घटनाप्रकरणी परदीपसिंग बिरिंग व जगदीप सैगल या दोन्ही बिल्डरांना गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रँच अधिकाऱ्यांनी मुंबई येथे अटक केली. गेल्या वर्षी जानेवारीत ‘रुबी’ची बांधकाम चालू असलेली इमारत कोसळून ३२ जण ठार झाले होते. बांधकाम चालू असतानाच ही इमारत कोसळल्याने त्याखाली गाडले जाऊन मजुरांचा दुर्दैवी अंत झाला होता. निष्कृष्ट बांधकामाबद्दल ‘रुबी’चे वरील दोन्ही बिल्डर्स पोलिसांना चौकशीसाठी हवे होते; परंतु दुर्घटनेनंतर ते फरार झाल्याने त्यांच्याविरुद्ध ‘लुक आउट’ नोटीस काढण्यात आली होती. परदीपसिंग बिरिंग याचा वावर मँचेस्टरमध्ये असल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी इंटरपोलने दिली होती व त्याला आपल्या करड्या नजरेखालीही ठेवले होते, असे असताना तो मुंबईत कसा काय दाखल झाला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या दुर्घटनेनंतर काणकोण पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक देसाई, प्रदीप नाईक व प्रशांत शिरोडकर तसेच पालिकेचे तत्कालीन अभियंते सुहास फळदेसाई, अशांक गावकर व अजय देसाई, उपनगर नियोजक प्रकाश बांदोडकर, ड्राफ्ट्समन रमेश नाईक व कंत्राटदार विश्वास देसाई यांना अटक झाली होती.
४ जानेवारी २०१४ रोजी काणकोणची ही पाच मजली इमारत कोसळली होती. राज्याला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटना प्रकरणातील संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सध्या चालू होती.
रुबी प्रकरणात संशयित असलेल्या नगरपालिका प्रशासनाच्या तीन अभियंत्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी पूर्वपरवानगी देण्यास नगरपालिका प्रशासन संचालनालयाने वेळ काढल्यामुळेच या आरोपपत्राची प्रक्रिया अडून पडली होती. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पालिका प्रशासन संचालक एल्वीस गोम्स यांनी ही मान्यता दिलेली आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा क्राईम ब्रँचचा दावा आहे. सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली या नऊजणांसह दोन्ही बिल्डरांविरुद्ध आता आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.
दोघेही बिल्डर्स वाशी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हा शाखेचे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर आदींचे पथक मुंबईला गेले होते. अटकेतील दोघांनाही गोव्यात आणले जात असून अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीचा रिमांड घेतला जाईल.
असे जाळ्यात अडकले...
बिल्डर बिरिंग हा मँचेस्टरहून भारतात कसा परतला, याचे गूढ कायम आहे. त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस असल्याने विमानतळावर तो कसा सापडू शकला नाही की, बोगस पासपोर्टने आला, याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. दोन्ही बिल्डर वाशी येथे मोठा व्यवहार करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांशी संपर्क साधून अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी मुंबईला पोलीस पाठवून
गुप्त पाळत ठेवली आणि दोघेही जाळ्यात अडकले. (प्रतिनिधी)

Web Title: Both builders are accused in the Ruby case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.