भाजपामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या नेत्यांची कमतरता - पर्रीकर
By Admin | Updated: November 7, 2014 11:00 IST2014-11-07T09:41:03+5:302014-11-07T11:00:19+5:30
भाजपामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या नेत्यांची कमतरता आहे असे परखड मत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मांडले आहे.

भाजपामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या नेत्यांची कमतरता - पर्रीकर
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ७ - भाजपामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या नेत्यांची कमतरता आहे. यामुळेच मला निर्णयक्षम व्यक्ती म्हणून बघितले जात असावे असे मत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मांडले आहे. मिळेल ती जबाबदारी स्वीकारायला तयार असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखात दिली आहे. यामध्ये पर्रीकर म्हणतात, सध्या सगळीकडेच निर्णय घेण्याची क्षमता असलेल्यांची कमतरता भासत आहे. भाजपाही याला अपवाद नाही. मी भाजपामध्ये आलो त्यावेळी पक्षात २० ते ३० नेते होते. आता मात्र भाजपामध्येही अशा नेत्यांची उणीव भासू लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळी गोव्यातील भाजपाचे सचिव होते तेव्हापासून आमची ओळख आहे. गोव्यातील माझे कामकाज बघून लोकांना मी केंद्रात असायला हवे असे वाटत असावे अशी त्यांनी म्हटले आहे. संरक्षण क्षेत्रात भारतातच निर्मिती झाल्यास देशातील तरुणांसाठी रोजगाराचे नवा पर्याय निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
---------------
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निश्चित झाले असून उद्या पर्रीकर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. यानंतरच पर्रीकर यांचा उत्तराधिकारी निवडला जाईल असे भाजपातील सूत्रांनी म्हटले आहे. पर्रीकर १० नोव्हेंबरसाठी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. उत्तरप्रदेशमधून त्यांना राज्यसभेतील खासदारकी मिळणार आहे.