मडगावात भाजपात बंडाळी अटळ
By Admin | Updated: October 7, 2015 01:44 IST2015-10-07T01:44:40+5:302015-10-07T01:44:50+5:30
मडगाव : मोठ्या प्रयासानंतर भाजपने मडगाव पालिकेसाठी आपले २४ उमेदवारांचे पॅनल जाहीर केले असले तरी बंडाळी रोखण्यास या पक्षाला यश येणार नाही

मडगावात भाजपात बंडाळी अटळ
हे स्पष्ट झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी नगरसेवक नारायण फोंडेकर यांच्यासह किमान चार संभाव्य उमेदवारांना उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपमध्ये बंडाळी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मडगाव विकास आघाडी या नावाखाली हे पॅनल निवडणुकीत उतरणार आहे. प्रभाग १ मधून ही आघाडी स्वतंत्र उमेदवाराला आपला पाठिंबा देणार आहे.
मालभाटच्या प्रभाग १७ मधून अधिकृत उमेदवार रूपेश महात्मे यांच्या विरोधात भाजपाचेच एल्वीस फर्नांडिस हे निवडणूक लढविणार आहेत. तर आकेतील प्रभाग १९ मधून अधिकृत उमेदवार सुरेंद्र हळदणकर यांच्याविरुध्द भाजपचेच डीन डिसोझा व सचिन सातार्डेकर हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
ही यादी जाहीर केल्यानंतर भाजपने अल्पसंख्याक कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याची भावनाही उफाळून आली आहे. फातोर्ड्यातील ११ प्रभागांपैकी भाजपने तीन प्रभागांत ख्रिस्ती उमेदवारांना उमेदवारी दिली असली तरी मडगावातून एकाही ख्रिस्ती उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली नाही. भाजपमध्ये निष्ठावानांची कदर नाही, अशी प्रतिक्रिया एल्वीस फर्नांडिस यांनी व्यक्त केली. तर ज्येष्ठ कार्यकर्ते फोंडेकर यांनी उमेदवारी नाकारल्याने आपल्याला वाईट वाटले; पण तरीही पक्षाशी बंडखोरी करणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
फातोर्ड्यातही अशाचप्रकारे बंडखोरी प्रभाग ५ मधून होण्याची शक्यता होती. या प्रभागातून फातोर्डा मंडळाचे अध्यक्ष अरुण फळदेसाई यांना उमेदवारी निश्चित केल्याने युवा नेते सुजय लोटलीकर यांच्याकडून बंडखोरी होण्याची शक्यता होती. मात्र, नंतर या यादीत बदल करून लोटलीकर यांनाच उमेदवारी दिल्याने हा वाद शमला आहे. मात्र, प्रभाग २५ मध्ये पूर्वी भाजपने उमेदवारी देतो, असे सांगून पुढे आणलेले प्रशांत शिरोडकर यांना उमेदवारी नाकारून नागराज नाईक यांना उमेदवारी दिल्याने या प्रभागातही बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. (प्रतिनिधी)