लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : राज्य सरकार कोळसा वाढवून राज्याला 'कोळसा हब' करण्याचा षडयंत्र रचत आहे. हे जनतेच्या हितासाठी कार्य सरकार करीत नसून, ते कोळसा हाताळणाऱ्या उद्योजकांसमोर नतमस्तक होत आहे. म्हणूनच सरकारने दक्षिण गोव्यातून रेल्वे दुपदरी मार्ग करून वेळसाव, इर्सोशी, कासावली आणि इतर ठिकाणी जमिनी ताब्यात घेण्याचा डाव रचला असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.
पश्चिम घाटातून येणाऱ्या दक्षिण पश्चिम रेल्वे प्राधिकरणाचा दुपदरी रेल्वे मार्ग फक्त मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीसाठी करत असल्याचे रेल्वे निगमच्या वॅबसाईटद्वारे जाहीर झाले झाले.
अचानक रेल्वे निगमने मंगळवारी (दि. २) आपल्या वॅबसाईटवरील तो संदेश डिलिट केला आहे, असे पाटकर यांनी येथे बुधवारी (दि. ३) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांच्याबरोबर विरोधी पक्षनेते आमदार युरी आलेमाव, गोवा प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख नियाजी शेख, गोवा प्रदेश काँग्रेसचे इतर मागास वर्गीय समितीचे अध्यक्ष आणि मुरगावचे माजी नगराध्यक्ष नितिन चोपडेकर, माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
'ती' रक्कम वसून करा'
मुरगाव पोर्ट अथोरेटीच्या धक्का क्र. ६ आणि ७ वर कोळसा अनेक पटींनी वाढला असून, आजपर्यंत राज्य सरकारने कोळसा हाताळणाऱ्या अदानी व जेएसडब्ल्यू कडून चार हजार कोटींचा विशेष आर्थिक रक्कम (ग्रीन सेझ) वसूल केली नाही. कारण राज्य सरकारवर ही रक्कम वसुल न करण्याचा दबाव केंद्रीय भाजप सरकारने टाकल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.