शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
4
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
5
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
6
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
7
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
8
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
9
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
10
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
11
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
12
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
13
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
14
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
15
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
16
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
17
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
18
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
19
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
20
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपलाही धोक्याची घंटा; निवडणूक निकालांनी विरोधकांप्रमाणेच दिला धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 09:53 IST

झेडपी निवडणूक भाजप जिंकला हे यश महत्त्वाचे व मोलाचेच आहे. मात्र या निकालाने जसा काँग्रेसला व एकूणच विरोधकांना धडा दिला, तसाच तो धडा भाजपलाही दिला आहे. काही मंत्री व आमदार वीक विकेटवर आहेत, हेही निकालाने दाखवले आहे.

सारीपाट, सदगुरू पाटील संपादक, गोवा

झेडपी निवडणूक निकाल लागला आणि पेडण्यातील एक कार्यकर्ता मला म्हणाला की- कोरगावमध्ये एका बूथवर भाजपला केवळ ५० मते मिळाली आहेत. हरमल झेडपी मतदारसंघात कोरगावचा भाग येतो आणि कोरगाव हा पेडणे विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे. कोरगावमध्ये कमी मते मिळाल्यानेही हरमल झेडपी मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. कोरगावमध्ये बहुतांश सगळे हिंदूच. तरीही भाजपला अपेक्षित प्रमाणात मते मिळविता आली नाहीत. आता गोव्याच्या दुसऱ्या टोकाचे उदाहरण घेऊया. श्रीस्थळ व आगोंद. हे भाग काणकोण विधानसभा मतदारसंघात येतात आणि हे भाग खोला झेडपी मतदारसंघात येतात. खोलाची जागा काँग्रेसने जिंकली.

मला बाबू कवळेकर यांच्या जवळच्या कार्यकर्त्याने सांगितले की- रमेश तवडकर यांनी श्रीस्थळ व आगोंदमध्ये जर अपेक्षित प्रमाणात भाजपला मते मिळवून दिली असती तर खोलाची जागा काँग्रेस पक्ष जिंकू शकलाच नसता. तिथे भाजपचाच उमेदवार जिंकला असता. कारण खोला झेडपीचा जो भाग केपे तालुक्यात येतो, तिथे भाजपला योग्य प्रमाणात मते मिळाली आहेत. श्रीस्थळ भागात बहुतांश हिंदूच आहेत. मात्र काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने बाजी मारली. अलीकडील काळात दिगंबर कामत व तवडकर या दक्षिणेतील दोन्ही नेत्यांना मंत्रिपदे दिली गेली. मंत्रिपद मिळाल्यामुळे दिगंबर कामत यांनी तर सहपरिवार दिल्लीवारी केली. पंतप्रधानांना भेटून त्यांनी आभारही मानले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनाही ते भेटले आणि त्यांचेही आभार मानले. मात्र सासष्टी तालुक्यात किंवा सासष्टीबाहेर दक्षिण गोव्यात कुठेच कामत यांचा भाजपला मते वाढविण्यासाठी लाभ झालेला नाही. झेडपी निवडणुकीचा मडगाव शहराशी संबंध नसला तरी, अगदी बाजूच्या नावेलीत भाजपचा दणदणीत पराभव झाला. उल्हास नाईक यांना कामत यांची कोणतीही मदत झाली नाही. कुंकळ्ळी परिसरातही काँग्रेस जिंकला. बार्से तेवढा बाबू कवळेकर यांनी जिंकून आणला. आलेक्स सिक्वेरा नुवेत भाजपचे आमदार आहेत. कुडतरीत आलेक्स रेजिनाल्ड हे अपक्ष असले तरी, ते भाजप सरकारसोबत आहेत. मात्र सासष्टीत यावेळी काँग्रेसला घसघशीत मते मिळाली. राय मतदारसंघात गोवा फॉरवर्ड जिंकला.

दक्षिण गोव्यात भाजप सावरलेला नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचा उमेदवार दक्षिणेत जिंकून आला. काँग्रेसकडे दक्षिणेत फक्त दोन आमदार आहेत, पण संजय वेळीप यांना काँग्रेसने आपल्याकडे वळवले व गिरदोलीत जिंकूनही आणले. सासष्टी, काणकोण, केपे, सांगे या तालुक्यांमध्ये भाजपला अधिक काम करावे लागेल. सांगेत रिवणची जागा भाजपने कशीबशी जिंकली. तिथे सुभाष फळदेसाई गेली साडेतीन वर्षे मंत्री आहेत. अर्थात सर्व विरोधक एक झाले म्हणून भाजपची मते कमी झाली असे म्हणता येते, पण विरोधकांनी संघटीत होणे, एक होणे हे अपेक्षितच असते. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी जर काँग्रेस, फॉरवर्ड, आरजी या तिघांची युती झाली तर भाजपचे अनेक मंत्री, आमदार यांना त्यांची रणनीती बदलावी लागेल. विशेषतः सरकारमधील काही आमदार व मंत्री हे सक्षम असले तरी, त्यांची लोकांमधील प्रतिमा बदलावी लागेल. सामान्य लोकांसोबत काहीजण सुडाचे राजकारण करतात, अशी लोकांची तक्रार आहे.

फोंडा तालुक्यात देखील भाजपला जास्त कष्ट घ्यावे लागतील. त्या तालुक्यात भाजपला मगो पक्षाची मदत होत आहे, हेही मान्य करावे लागेल. भाजप-मगो युती दक्षिण गोव्यात तेरा जागा जिंकू शकली. या तेरामध्ये मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या दोन जागा आहेत. झेडपी निवडणूक निकालाने काँग्रेसला व एकूणच विरोधकांना मोठा धडा दिलेला आहेच. विरोधक जर एकमेकांशी भांडत राहिले तर भाजपलाच २०२७ साली लाभ मिळेल. विरोधकांचे मग नुकसान होईल. या उलट विरोधकांची युती झाली तर भाजपला पूर्णपणे नव्याने रणनीती ठरवावी लागेल. भाजपला झेडपी निवडणूक निकालाने हाच धडा दिलाय की- दक्षिण गोव्यात अजून पक्षाचे संघटनही सावरलेले नाही. भाजप हा वर्षभर सर्वाधिक कार्यक्रम करत असतो. मेळावे, बैठका, रॅली, सभा, मिरवणुका सगळे काही भाजप करतो. शिवाय मन की बात वगैरे कार्यक्रमांमध्येही भाजपचे कार्यकर्ते सक्रिय असतात.

वारंवार कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही दिले जाते. तरीदेखील ज्या ठिकाणी विरोधक संघटीत होतात किंवा युती करतात तिथे भाजपची डाळ शिजत नाही, हे यावेळच्या झेडपी निकालाने अधोरेखित केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री विश्वजित राणे व मंत्री रोहन खंवटे या तिघाच नेत्यांच्या क्षेत्रात भाजपला सर्वाधिक मते मिळाली आहेत. यापैकी राणे व खंवटे हे मूळ भाजप नेते नाहीत. विश्वजित राणे यांचे चार झेडपी मतदारसंघ जर वगळले तर भाजपच्या मतांचे एकूण प्रमाण किती होईल? ते प्रमाण बरेच खाली येईल. यावेळच्या झेडपी निवडणुकीत मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी भाजपची मते वाढविण्यासाठी इंटरेस्ट दाखवला नाही. ताळगावमध्ये उमेदवार जिंकला की पुरे अशी भूमिका बाबूशने घेतली. सांताक्रुझमध्ये बाबूशने भाजपला सहकार्य केले नाही. हळदोण्यात काँग्रेसचा उमेदवार जिंकला.

कोलवाळ व शिरसईत काँग्रेसचा उमेदवार जिंकला. लाटंबार्सेत विरोधकांनी भाजपला टक्कर दिली पण विरोधक जिंकू शकले नाहीत. तरीही जिथे विरोधक संघटीत होतात तिथे भाजपचा कस लागतो, हे मान्य करावे लागेल. भाजपने दोन्ही जिल्हा पंचायती जिंकल्या आहेत, ही त्या पक्षासाठी स्वागतार्ह गोष्ट आहेच. साडेतीन चार वर्षे भाजपकडे सत्ता आहे. सर्वाधिक सरकारी योजनांचा लाभ भाजपने गावोगावी पोहोचवला आहे. पूल, रस्ते, उड्डाण पूल बांधले. तरीदेखील निवडणुकीवेळी अनेक आमदार, मंत्री यांना खूप खर्च का करावा लागतो? युवा मतदार नोकऱ्या मागतात.

२०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप व मगो यांना युती करूनच पुढे जावे लागेल, असाही धडा झेडपी निकालाने दिला आहे. समजा मगो पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती तर मते फुटली असती. डिचोली, पेडणे, फोंडा अशा काही तालुक्यांमध्ये व सावर्डेसह काही विधानसभा मतदारसंघांमध्ये मगोपची ठरावीक मते आहेत. बेतकी खांडोळ्यात भाजपचा उमेदवार पराभूत झाला. त्याचीखरी कारणेही भाजपला कधी तरी शोधावी लागतील. मंत्रिपद गेल्यानंतर गोविंद गावडे यांची मतदारसंघावरील पकड सैल झाली काय या प्रश्नाचे उत्तर कदाचित २०२७ मध्ये मिळू शकते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Election results: BJP gets a warning along with lessons for opposition.

Web Summary : Goa ZP election results reveal BJP's struggles in South Goa due to weak organization and opposition unity. Alliances are crucial for 2027 assembly polls.
टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत