बिस्मार्कचा अर्धा दिवस बिअरच्या नशेतच
By Admin | Updated: November 15, 2015 01:40 IST2015-11-15T01:40:11+5:302015-11-15T01:40:30+5:30
पणजी : स्वर्गीय फादर बिस्मार्क डायस यांनी कुणाविरुद्ध यापूर्वी तक्रारी दिल्या होत्या, सांतइस्तेव्ह येथील कोमुनिदाद व

बिस्मार्कचा अर्धा दिवस बिअरच्या नशेतच
पणजी : स्वर्गीय फादर बिस्मार्क डायस यांनी कुणाविरुद्ध यापूर्वी तक्रारी दिल्या होत्या, सांतइस्तेव्ह येथील कोमुनिदाद व क्रीडा संघटनेत त्यांचा कुणाशी वाद झाला होता, फादर डायस बुडून मरण पावले त्या दिवशी चारवेळा त्यांनी कुणाकडून बिअर खरेदी केली, या व अन्य सर्व घटनांचा परामर्ष घेत पोलिसांनी बिस्मार्कच्या पूर्ण कारकिर्दीचाच एकप्रकारे पंचनामा केला आहे. त्याच्या आधारे असे लक्षात येते की बिस्मार्कचा अर्धा दिवस बिअरच्या नशेतच गेलेला होता.
उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी सरकारला सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्या अहवालाची प्रत ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे. सात पानांच्या त्या अहवालातून फादर डायस यांचे दिवसभरातील वर्तन कळून येतेच, शिवाय त्यांचे यापूर्वी कुणाशी कोणत्या कारणावरून वाद झाले होते तेही स्पष्ट होते.
बिस्मार्क बेपत्ता झाल्याची तक्रार बिस्मार्कच्या चुलत भावाने ६ नोव्हेंबर रोजी जुनेगोवे पोलिसांत दिली होती. ५ नोव्हेंबर रोजी बिस्मार्कने दुपारी दीड वाजता सांतइस्तेव्ह येथील पालमार वाईन स्टोअरला भेट देऊन बिअरची मोठी बाटली घेतली. ती तो प्याला व मग साडेचार वाजता परमेश्वर नावाच्या व्यक्तीला त्याने याच वाईन स्टोअरवर पाठवून आणखी एक बिअर घेतली. मग साडेसहा वाजता बिस्मार्कने सतरा वर्षीय गणेश व अठरा वर्षीय डॅरेन या दोघा युवकांना सोबत घेतले व आपले घर गाठले. त्याने पाचशे रुपये या दोघांजवळ देऊन त्यांना बिअरचे एक कार्टन आणण्यास सांगितले. त्यानंतर सांतइस्तेव्ह येथील बाबल मानसजवळ सर्वांनी रात्री झोपण्यासाठी जाण्याचे ठरले. या वेळी या तिघांनी मिळून बबली बार गाठला व तिथून उधारीवर आणखी एक बिअर कार्टन आणले, असे पोलीस अहवालात म्हटले आहे. बाबल मानस येथे एक झोपडी असून तिथे दुचाकी वाहनही जाऊ शकत नाही. तिथे पंधरा ते वीस मिनिटे हे तिघेही चालत गेले. फादर डायसजवळ बॅटरी होती. रात्री तिघेही मानशीच्या झोपडीजवळ प्यायला बसले. फादर डायस यांनी मानशीजवळ पाण्यात उडी मारली. थोडा वेळ पोहून ते बाहेर आले व पुन्हा बिअर प्याले. मग मांडवी नदीच्या मुखापासून दहा मीटर अंतरावर फादर बिस्मार्क हे पाण्यात उतरले व नदीच्या मुखाच्या दिशेने गेले आणि मग पाण्यातून ते बाहेर आलेच नाहीत, असे पोलीस अहवालात म्हटले आहे.
गणेश व डॅरेन या दोघांनी बॅटरीच्या उजेडात बिस्मार्क यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिस्मार्कचा शोध न लागल्याने ते दोघेही मानशीजवळील झोपडीत येऊन झोपले. बिस्मार्क येतील असे त्या दोघांना वाटले होते, असे पोलीस अहवालात म्हटले आहे. तत्पूर्वी फादर बिस्मार्क यांच्या घरापासून १०-१५ मीटरवरील एका जागेत जॉयसन नावाची व्यक्ती आणि गणेशचा भाऊ हे डॅरेन व गणेश यांचा शोध घेण्यासाठी आले होते. घरची मंडळी या दोघांना शोधत असल्याचे त्यांनी फादर बिस्मार्क यांना सांगितले. त्या वेळी बिस्मार्क यांनी हे दोन्ही युवक आपल्यासोबत असल्याचे त्यांच्या पालकांना सांगा, आपण त्यांना नंतर घरी आणून सोडेन, असे जॉयसन व गणेशच्या भावाला सांगितले, असे पोलीस अहवालात म्हटले आहे. त्यानंतर जॉयसन व गणेशचा भाऊ निघून गेले. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी फादर डायस यांचा मृतदेह मांडवी नदीत सांतइस्तेव्ह येथे तरंगताना आढळला. आपल्याला धमक्या येत असल्याचे फादर डायस यांनी पोलिसांना कधीच कळवले नव्हते.
(खास प्रतिनिधी)