राज्यात वन खात्यातर्फे २७ ते २९ दरम्यान पक्षी महोत्सवाचे आयोजन
By समीर नाईक | Updated: January 15, 2024 15:31 IST2024-01-15T15:30:46+5:302024-01-15T15:31:07+5:30
राज्यात जवळपास ४५० पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती आहेत. या पक्षांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात वन खात्यातर्फे २७ ते २९ दरम्यान पक्षी महोत्सवाचे आयोजन
पणजी : वन खात्यातर्फे दि. २७ ते २९ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय ७ व्या पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर पक्षी महोत्सव दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे होणार आहे.
राज्यात जवळपास ४५० पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती आहेत. या पक्षांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वन खात्याकडून वर्षीच्या पक्षी महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू यानिमित्त पक्षी कार्यशाळा, पक्षी निरीक्षण यांसारखे कार्यक्रम होणार आहेत. पक्षी तज्ज्ञ, कलाकार यांचाही या महोत्सवात सहभाग असेल. महोत्सव प्रतिनिधीसाठी ३५०० रुपये आणि विद्यार्थी प्रतिनिधीसाठी १ हजार रुपये शुल्क आकारले जातील, असे कळविण्यात आले आहे.
यापूर्वी बोंडला अभयारण्य, मोले अभयारण्य, सलीम अली पक्षी अभयारण्य, खोतीगाव अभयारण्य या सारख्या भागात पक्षी महोत्सवाचे यशस्वी आयोजन खात्यातर्फे करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम
या पक्षी महोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम देखील वन खात्यातर्फे राबविले आहे. यामध्ये शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा, तर महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा, आणि छायाचित्र स्पर्धा खुल्या गटात आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील, असेही वन खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.