विधानसभेसाठी ‘बिहारी फॉर्म्युला’

By Admin | Updated: November 22, 2015 01:40 IST2015-11-22T01:39:57+5:302015-11-22T01:40:40+5:30

वास्को : गोव्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांची या दिवसातील वक्तव्ये आणि कृती पाहिल्यास पुढील

'Bihari Formula' for Vidhan Sabha | विधानसभेसाठी ‘बिहारी फॉर्म्युला’

विधानसभेसाठी ‘बिहारी फॉर्म्युला’

वास्को : गोव्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांची या दिवसातील वक्तव्ये आणि कृती पाहिल्यास पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्तेवर आणणे हा त्यांचा छुपा अजेंंडा आहे. गोव्यात जर भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असल्यास पुढील निवडणुकीत ‘बिहारी फॉर्र्म्युला’ वापरणे अत्यंत गरजेचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फि लिप डिसोझा यांनी सांगितले़
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील विधानसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषद झाली. या वेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष देवानंद नाईक, प्रवक्ते ट्रोजन डिमेलो, सदस्य प्रशांत दीनानाथ लोटलीकर, जुझे मास्कारेन्हस उपस्थित होते़
गेल्या आठवड्यात काँग्रेस पक्षाने मडगावच्या लोहिया मैदानावर आयोजित केलेल्या असहिष्णुता शपथ सोहळ्यात गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष लुईझिन फ ालेरो यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वत:च्या हिमतीवर सर्व जागा लढविणार असून त्यांना महागठबंधनाची गरज नसल्याचे सांगितले़ त्यांच्या या वक्तव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी आक्षेप घेत महागठबंधनात सामील व्हावे किंवा नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असून असा निर्णय जाहीर करण्याचा प्रदेशाध्यक्षांना अधिकार नाही़ काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यापुढे अशा प्रकारची वक्तव्ये करण्यापासून दूर राहावे, असा सल्ला दिला़
सर्व मतदारसंघांत उमेदवार उभे करू...
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने लुईझिन फ ालेरो यांचे कार्य व कृती पाहिल्यास पुढील विधानसभा निवडणुकीत ते भाजपला सत्तेवर आणण्यासाठी छुपा अजेंडा राबवत असल्याचा आरोप डिसोझा यांनी केला़ पुढील निवडणुकीत गोव्यात सर्व पक्षांनी एकत्र येऊन महागठबंधन घडवून आणल्यास काँग्रेस पक्षाशी युती न झाल्यास गोव्यातील ४०ही मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याची पक्षाची ताकद आहे़ या पक्षात अनेक नेते येण्यास तयार असून योग्यवेळी हे नेते पक्षांतर करतील़ ताळगावचे आमदार तसेच सत्ताधारी भाजपचे काही आमदार पक्षात येण्यास तयार असून त्यांच्याशी चर्चा चालू आहे, असे डिसोझा यांनी सांगितले़
ट्रोजन डिमेलो यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली़ गेल्या आठवड्यात त्यांनी मडगावच्या लोहिया मैदानावर सहिष्णुता शपथ सोहळा आयोजित केला होता; पण त्यात भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्यात आला नाही.
काँग्रेस पक्ष भाजप मंत्र्यांचा भष्ट्राचार तसेच घोटाळे यांच्याबाबतीत एकही शब्द काढत नाही़ काँग्रेस पक्षाचा एक आमदार सत्ताधारी गटाशी सूत जुळवून दक्षिण गोवा नगर विकास आणि नियोजन प्राधिकरणाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्ष त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही़ यावरून काँग्रेस पक्ष भाजपशी एक प्रकारे सोयरिक जुळवत आहे, असा आरोप डिमेलो यांनी केला़
गोव्यात पुढील निवडणुकीत महागठबंधनाची अत्यंत गरज असून त्याबाबतीत कॉँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला पाहिजे; पण त्यांची सध्याची भूमिका पाहिल्यास ते गोव्यातील नागरिकांना फसवीत असून त्यांना भाजपची जास्त चिंता असल्याचे डिमेलो यांनी सांगितले़
या वेळी डिमेलो यांनी कॉँग्रेस पक्षाचे आमदार माविन गुदिन्हो यांच्यावरही टीका केली. या आमदाराने गोव्यातील कॉँग्रेस पक्षाच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांविरुध्द सीईझेडप्रकरणी विधानसभेत आरोप केले़ कॉँग्रेस पक्षाला तुच्छ मानले आणि कॉँग्रेस नेत्यांचे मानखंडन करत असून पक्ष त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता मूग गिळून गप्प राहते यात काय अर्थ आहे, असा सवाल केला़
(प्रतिनिधी)

Web Title: 'Bihari Formula' for Vidhan Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.