मद्य व्यवसायाला मोठा फटका
By Admin | Updated: April 1, 2017 02:12 IST2017-04-01T02:10:48+5:302017-04-01T02:12:57+5:30
पणजी : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांलगत असलेले बार तसेच दारू दुकानांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने आपला आदेश उचलून

मद्य व्यवसायाला मोठा फटका
पणजी : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांलगत असलेले बार तसेच दारू दुकानांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने आपला आदेश उचलून धरल्याने त्याचा मोठा फटका राज्यातील मद्य आस्थापनांना बसणार आहे. शहरे तसेच किनारी भागांपेक्षा राज्यातील अंतर्गत भागातील दारू दुकानांना याची मोठी झळ बसणार असून मद्य व्यवसाय अक्षरश: कोलमडून पडण्याच्या स्थितीत आहे. या व्यवसायात असलेले व्यावसायिक प्रचंड हादरले आहेत.
गोव्यात सर्वच राष्ट्रीय महामार्ग राज्याच्या अंतर्गत भागातून जातात आणि आठपैकी बहुतांश राज्य महामार्ग मध्य भागातून किंवा अंतर्गत भागातून इतकेच नव्हे तर अभयारण्यातूनही जातात.
२0 हजार कुटुंबांचा प्रश्न
राज्य महामार्गांचे रूपांतर जिल्हा मार्गांत केल्यास हा प्रश्न निकालात येऊ शक तो, असे व्यावसायिकांचे मत होते; परंतु या गोष्टीला आता फार उशीर झालेला आहे. ३२00 मद्यालये बंद झाल्यास हजारो कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. केवळ मद्य व्यावसायिकच नव्हे तर मद्यालयांमध्ये काम करणारे वेटर, स्वयंपाकी तसेच दारू दुकानांमध्ये काम करणारे सेल्समन, अकाउंटंट आदी सुमारे १५ ते २0 हजार कुटुंबांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे, असे गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक म्हणाले. नाईक यांच्या नेतृत्वाखाली व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने रात्री अबकारी आयुक्तालय गाठले; परंतु आयुक्त मिनीन डिसोझा यांच्याशी त्यांची भेट होऊ शकली नाही.
व्यावसायिकांच्या मते अबकारी खात्याने भू नोंदणी अधिकाऱ्यांच्या मदतीने दारू दुकानांच्या बाबतीत महामार्गांपासून केलेली मोजमापणी चुकीची आहे. महामार्गांपासून आत दुकानापर्यंत येणाऱ्या रस्त्याची मोजमापणी न करता समांतर मापणी केलेली आहे. ती चुकीची आहे. ही चूक सुधारल्यास किमान १00 दारू दुकाने वाचली असती. काणकोण येथे गालजीबाग भागात महामार्गापलीकडे नदी ओलांडून असलेले बार, दारू दुकाने बाधित ठरवली गेली आहेत. मोर्ले येथे डोंगरापलीकडील दारू दुकाने या यादीत टाकली आहेत.
पणजीत मांडवी पुलापासून जवळ असल्याने जलसफरी करणाऱ्या पर्यटक बोटी कचाट्यात आल्या आहेत; परंतु कॅसिनोंबाबत स्पष्टता नाही. दोन्ही ठिकाणी मद्य पुरविले जाते. कोर्तिम भागातील ५0 दारू दुकाने, बार कचाट्यात आले आहेत.
(प्रतिनिधी)