भाऊसाहेबांवरून नव्या वादाला तोंड; विजय सरदेसाईंच्या विधानाचा मुख्यमंत्र्यांसह ढवळीकर बंधूंकडून समाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2025 13:52 IST2025-01-23T13:51:14+5:302025-01-23T13:52:11+5:30
वेंझींचीही कडाडून टीका

भाऊसाहेबांवरून नव्या वादाला तोंड; विजय सरदेसाईंच्या विधानाचा मुख्यमंत्र्यांसह ढवळीकर बंधूंकडून समाचार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेची अॅलर्जी होती व त्यामुळेच या प्रश्नावर जनमत कौल घेण्याची वेळ आली होती, अशा अर्थाचे विधान गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केल्यानंतर आता राज्यात मोठा वाद निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अन्य काही नेत्यांनी काल सरदेसाई यांच्या विधानास आक्षेप घेत टीका केली.
सरदेसाई यांनी हे विधान करताना विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही गोव्याच्या अस्मितेची अॅलर्जी असल्याचा आरोप केला आहे. जनमत कौल दिन सरकारी पातळीवर साजरा करण्याचे आश्वासन विधानसभेत देऊनही सावंत यांनी ते पाळले नाही, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.
दरम्यान, आमदार विजय सरदेसाई यांच्या विधानानंतर मुख्यमंत्र्यांसह मगोपचे नेते मंत्री सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर यांनीही त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. दरम्यान, राज्यभरातून टीका होऊ लागल्यानंतर आमदार विजय सरदेसाई यांनी काल सायंकाळी पत्रकारांशी बोलताना भाऊसाहेबांबद्दल आपल्या आदर असल्याचे सांगत मुख्यमंत्री सावंत यांचा अहंकार जागा झाल्याची टीका केली. तसेच यावेळी त्यांनी आपचे आमदार वेंझी व्हिएगश यांचाही खरपूस समाचार घेतला.
मी केवळ लोकांना इतिहास सांगितला
मी भाऊसाहेबांचा पूर्ण आदर करतो. खरंतर हा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याच अहंकाराचा मुद्दा आहे. त्यांची तुलना भाऊसाहेबांशी करून त्यांची खुशामत केल्यानंतर त्यांचा अहंकार सुखावला गेला आहे. आपण केवळ ऐतिहासिक सत्य लोकांसमोर आणले आहे, असे स्पष्टीकरण आमदार विजय सरदेसाई यांनी काल सायंकाळी पत्रकारांशी आमदार बोलताना दिले. ज्या घरामधून ओपिनियन पोलचा लढा लढला गेला, त्या घराण्याचा मी वारस आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना केवळ जॅक सिक्वेरा यांनाच नाकारायचे नाही तर ज्या नेत्यांनी गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम ठेवले त्या रवींद्र केळेकर, उदय भेंब्रे, शंकर भांडारी, उल्हास बुयांव तसेच अन्य नेत्यांनाही श्रेय द्यायची इच्छा नाही. मात्र, या लोकांनी गोव्याचे अस्तित्व वेगळे ठेवले, यासाठीच प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री होऊ शकले. अन्यथा ते कुठल्या तरी पंचायतीचे सरपंच झाले असते याची जाणीव त्यांनी ठेवावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांकडून निषेध
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेची कधीच अॅलर्जी नव्हती. त्यांना भाऊसाहेबांनी त्यावेळी चूक केली किंवा अस्मितेची अॅलर्जी होती, असे म्हणणे हा निव्वळ खोटारडेपणाच नव्हे, तर गोव्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या वारशाचा घोर अपमान आहे. खरी समस्या सरदेसाई यांच्या अहंकाराची आहे. भाऊसाहेबांबद्दल काढलेल्या या उद्गारांचा तसेच गोवाविरोधी वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो.
कुठल्याच मुख्यमंत्र्याची भाऊंशी तुलना नको
मगोपचे ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, सरदेसाईंचा हेतूच मला समजलेला नाही. विलीनीकरणासाठी त्यावेळी सुदिन ढवळीकर वीजमंत्री भाऊसाहेबांवर वरिष्ठ नेत्यांकडून दबाव होता. भाऊसाहेबांना दोष देता येणार नाही. तसेच गोव्याच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांची भाऊसाहेबांशी तुलना करता येणार नाही. १९६३ ते १९७३ या काळात भाऊसाहेबांनी राज्याचा सर्वांगीण विकास केला.
भाऊंनी सिक्वेरांना आतून पाठिंबा दिलेला
मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, बांदोडकर यांच्या काळातील माजी आमदार रोहिदास नाईक व इतर काही जण हयात आहेत, त्यांच्याकडून सरदेसाई यांनी आधी इतिहास जाणून घ्यावा. भाऊसाहेबांनी त्यावेळी जॅक सिक्वेरा यांना आतून पाठिंबाही दिला होता. सरदेसाई यांना मगोप, मराठी आणि भाऊसाहेबांबद्दल अॅलर्जी असल्यानेच ते अशी विधाने करत आहेत.
वेलिंगकरांकडून धिक्कार
भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेचा तिटकारा होता, असा शोध लावलेल्या विकृतीचा मी तीव्र धिक्कार करतो, असे प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, गोव्याची संस्कृती, गोव्याची अस्मिता ही मूलतःच शुद्ध भारतीय आहे आणि जुलमी पोर्तुगीज राजवटीत रक्तबंबाळ करण्यात आलेली हीच अस्मिता दृढमूल करण्यासाठी बांदोडकरांनी सत्तेवर येताच हजारो मराठी शाळा सुरू केल्या.
तेव्हा अस्मिता कुठे गेली?
२०१७ साली भाजपशी मोट बांधून सरकार स्थापनेसाठी त्या पक्षाला पाठिंबा दिला तेव्हा सरदेसाईंची अस्मिता पेंड खायला गेली होती का? हिंमत असेल तर त्यांनी भू- रुपांतरणे बंद करावीत. सरदेसाई हे स्वतःच मुळात भाजपसोबत आहेत. लोकांना दाखवण्यासाठी ते विरोधात भाषणे करतात, सणसणीत टोला आपचे आमदार वेंझी व्हिएगश यांनी लगावला.