‘भाभासुमं’चे आंदोलन बहुजनांच्या विरोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 02:19 IST2016-07-05T02:19:11+5:302016-07-05T02:19:11+5:30
मडगाव : भारतीय भाषा सुरक्षा मंचने इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांविरुध्द सुरु केलेले आंदोलन प्रत्यक्षात हिंदू बहुजन

‘भाभासुमं’चे आंदोलन बहुजनांच्या विरोधात
मडगाव : भारतीय भाषा सुरक्षा मंचने इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांविरुध्द सुरु केलेले आंदोलन प्रत्यक्षात हिंदू बहुजन समाजाच्या विरोधातील आहे. बहुजन समाजातील मुलांना प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून हवे आहे; मात्र या घटकाला हे शिक्षण मिळू नये असाच भाभासुमंचा डाव असावा, असा आरोप फोर्सचे सावियो लोपीस यांनी केला.
इंग्रजी माध्यमातील शाळासंदर्भातील आपल्या आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी लोपीस यांनी मडगावात सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते म्हणाले, संघातील नेते स्वत:च्या मुलांना इंग्रजी शिक्षण देत आहेत. एवढेच नव्हे तर दिल्लीत संघातर्फे इंग्रजी प्राथमिक शाळा चालू आहेत. मात्र, गोव्यातील बहुजन समाजाने इंग्रजीचे शिक्षण घेऊ नये असा त्यांचा डाव आहे.
इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचे कायद्यात रुपांतर करावे, ही फोर्सची मागणी कायम असून हा कायदा झाल्याशिवाय आपले आंदोलन बंद होणार नाही, असे ते म्हणाले. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आॅगस्ट महिन्यात फोर्सची आमसभा घेतली जाणार असून या सभेत नवीन कार्यकारिणी निवडण्याबरोबरच आंदोलनाची रूपरेषाही ठरविली जाणार आहे. यासाठी येत्या सोमवारपासून प्रत्येक शाळेत जाऊन पालकांशी संवाद साधण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)