सरकारकडून विश्वासघात
By Admin | Updated: January 4, 2015 02:30 IST2015-01-04T02:21:42+5:302015-01-04T02:30:00+5:30
एलिनांची उपस्थिती : गोवाज मूव्हमेंट फॉर स्पेशल स्टेटसतर्फे आरोप

सरकारकडून विश्वासघात
पणजी : गोव्याला खास दर्जाच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विश्वासघात केल्याचा आरोप गोवाज मूव्हमेंट फॉर स्पेशल स्टेटस या संघटनेतर्फे शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केला. या वेळी वनमंत्री एलिना साल्ढाणाही उपस्थित होत्या. या मागणीसंदर्भातील ठराव यापूर्वी विधानसभेत सर्वानुमते मंजूर केला; पण मुख्यमंत्र्यांनी खास दर्जा मिळणे शक्य
नाही, असे विधान करून सरकारने गोमंतकीयांचा विश्वासघात केला, असे या संघटनेने म्हटले आहे.
प्रजल साखरदांडे, गुरुदास कामत, अॅड. जतीन नाईक आदींनी सांगितले की गोव्याला खास दर्जा मिळवून देण्याची ग्वाही यापूर्वी आम्हाला संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी अॅड. नरेंद्र सावईकर यांनीही खास दर्जाची मागणी हा निवडणुकीचा मुद्दा बनविला होता. मात्र, आता मुख्यमंत्री पार्सेकर खास दर्जा मिळणे शक्य नाही, असे म्हणतात व सावईकर मात्र त्याविषयी काहीच प्रतिक्रिया देत नाही. म्हणजे निवडणुकीवेळी या राजकीय नेत्यांनी लोकांना फक्त वापरले, आम्ही याचा
निषेध करतो.
गोव्याला खास दर्जा मिळवून देण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू. मुख्यमंत्री पार्सेकर यांना कायद्याचे ज्ञान नाही. घटनेच्या ३७० कलमाखाली गोव्याला खास दर्जा निश्चितच मिळू शकतो. आम्ही मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहोत; पण तत्पूर्वी त्यांनी केलेले विधान हा विश्वासघात ठरतो हे त्यांना कळायला हवे. मुख्यमंत्र्यांनी खास दर्जाविषयी केलेले विधान ही सरकारची अधिकृत भूमिका आहे काय तेही स्पष्ट व्हावे, असे कामत म्हणाले.
या वेळी मंत्री साल्ढाणा म्हणाल्या की, आपण मंत्री या नात्याने नव्हे तर गोव्याला खास दर्जा मिळायला हवा, अशी मागणी करणाऱ्यांपैकी एक कार्यकर्त्या या नात्याने पत्रकार परिषदेस आले आहे. खास दर्जा मिळावा ही माझे पती स्वर्गीय माथानी यांचीही मागणी होती. गोव्याला तातडीने खास दर्जा मिळायलाच हवा, अशी आमची मागणी आहे. आम्ही ही मागणी पूर्ण होईपर्यंत संघर्ष करत राहू. (खास प्रतिनिधी)