लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात सगळीकडे रस्त्यांवर खड्डे असल्याने वाहन अपघात होत असल्याने राज्यभर अजून लोक त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. रस्त्यांची कामे सरकारने लवकर करून द्यावीत व खड्डे बुजवून रस्ते अतिशय सुस्थितीत आणावेत अशी मागणी लोक करत आहेत. मात्र, हॉटमिक्स प्रकल्प तयार झाल्याशिवाय रस्त्यांची कामे होणे अशक्य असल्याचे काल स्पष्ट झाले. रस्त्यांवरील खड्डे बुजण्यासाठी लोकांना व वाहनधारकांना अजून प्रतीक्षा करावी लागेल हेही स्पष्ट झाले आहे.
मंत्री दिगंबर कामत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आल्यानंतर खात्याचे अभियंते कामाला लागले आहेत. विविध स्तरांवर बैठका होत आहेत. मात्र, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा मार्ग अजून खुला झालेला नाही. याविषयी पत्रकारांनी काल मंत्री कामत यांना विचारले असता, त्यांनी वस्तुस्थिती सांगितली.
तयार 'हॉटमिक्स प्रकल्प झाल्याशिवाय रस्त्यांची कामे अशक्य आहेत' असे मंत्री कामत यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर एकदा रस्ते हॉटमिक्स केल्यानंतर कुठल्याही खात्याला वाहिन्या किंवा केबल्स टाकण्यासाठी ते खोदायचे असतील तर बांधकाम खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्याची पूर्वपरवानगी अनिवार्य असेल, अन्यथा कारवाई होईल,' असा इशाराही कामत यांनी दिला आहे.
कामत म्हणाले की, 'रस्त्यांच्या स्थितीची संपूर्ण माहिती मी घेतलेली आहे. अवघे काहीच रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहेत. खड्डे जेट पॅचरने बुजवण्याचे काम सध्या चालू आहे. परंतु हे तात्पुरते स्वरूपाचे काम आहे. पावसात जेट पॅचरही काम करू शकत नाही आणि हॉटमिक्स प्रकल्प तयार झाल्याशिवाय रस्त्यांचे काम करणे शक्य नाही.'
मान्सूननंतर कामाला वेग
कामत म्हणाले की, 'रस्त्यांच्या स्थितीविषयी मी मतदारसंघनिहाय माहिती घेतलेली आहे. किती रस्ते चांगल्या स्थितीत आहेत, किती साधारण स्थितीत व किती अगदीच खराब स्थितीत आहेत, हे सर्व जाणून घेतले आहे. पावसामुळे काही कामे अडली आहेत. मान्सून माघारी परतल्यानंतर कामाला वेग येईल.'
सरकारी हॉटमिक्स प्रकल्प बंद का केला?
दरम्यान, उसगाव येथील सरकारी हॉटमिक्स प्रकल्प यापूर्वीच नीलेश काब्राल वगैरे मंत्रिपदी असताना बंद झाला, अशी माहिती 'लोकमत'ला मिळाली. सुदिन ढवळीकर हे बांधकाम खात्याचे मंत्री होते, तेव्हा ढवळीकर यांनी उसगावात हॉटमिक्स प्रकल्पाचे नूतनीकरण केले. तो सज्ज ठेवल्याने खासगी कंत्राटदारांवर दबाव येत होता. मात्र दीपक पाऊसकर, काब्राल वगैरे बांधकाम मंत्री झाले त्या काळात उसगावचा हॉटमिक्स प्रकल्प भंगारातच काढला गेला. दिगंबर कामत यांनी नव्याने हॉटमिक्स प्रकल्प उभा करावा, असे जाणकार सुचवत आहेत.