लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : बायणा येथील चामुंडी आर्केड इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील सागर नायक यांच्या फ्लॅटवर पडलेल्या दरोडा प्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेण्यास पोलिसांना यश मिळाले. या संशयितांपैकी काहींना ओडिशामध्ये आणि तर इतरांना मुंबई - महाराष्ट्रातून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरोड्यावेळी संशयिताने लुटलेले बहुतांश सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले. दरोडेखोरांसह पोलिस पथकाला मुंबईहून आणण्यासाठी खास बस पाठविण्यात आली आहे. हे पथक उशिरा आज, गोव्यात परतेल, असा अंदाज आहे.
दरम्यान, सागर नायक यांच्या मालकीच्या गाड्यावर काम केलेला एक कामगारच या दरोडा प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच या प्रकारणाचा उलगडा होईल, अशी शक्यता आहे. नायक यांच्या फ्लॅटवर १८ नोव्हेंबर पहाटे सात दरोडेखोरांनी घुसून त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना जबर मारहाण केली होती. घरातील रोख रक्कम, सोने, चांदीचे दागिने घेऊन संशयितांनी पळ काढला होता. या दरोड्यानंतर खळबळ उडाली होती. गेल्या काही दिवसांपासून पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत होते. मात्र त्यात यश मिळाले नव्हते.
राज्यात दोनापावला-पणजी, म्हापशासह सलग पडलेल्या दरोडा, चोरीच्या घटनांनी सर्वसामान्यांमध्ये संतापाची प्रतिक्रिया होती. अखेरी बायणातील या दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले. आतापर्यंत सहाजणांना पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांबाबत माहिती मिळताच पोलिसांची काही पथके चार दिवसांपूर्वीच राज्याबाहेर रवाना झाली होती.
पोलिसांनी काही संशयितांना ओडिशामध्ये, तर काहींना मुंबईतून गजाआड केल्याचे सांगण्यात आले. मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक शरीफ जॅकीस यांनी बुधवारी सागर नायक यांची घरी भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आतापर्यंत सहा दरोडेखोरांना पकडण्यात आल्याची माहिती दिली. आणखी एका संशयिताबाबत माहिती मिळाली असून, त्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
सागर यांच्या फ्लॅटमधील या दरोड्यातील सहा संशयितांकडून लुटलेला मोठ्या प्रमाणातील ऐवज हस्तगत करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिस महासंचालक, महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, अधीक्षक आणि उपअधीक्षकांनी दिवस-रात्र एक करून तपासाला मार्गदर्शन केले, अशी माहिती निरीक्षक जॅकिस यांनी दिली.
सोने विकायला आले अन्...
काही दरोडेखोर दरोड्यातील सोन्याचे दागिने विक्रीसाठी मुंबई येथे घेऊन आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना तेथे जाऊन ताब्यात घेतले; तर काही दरोडेखोरांना ओडिशातून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या सहा दरोडेखोरांना मुंबईत आणले असून, तेथून त्यांना बसमधून गोव्यात आणले जाईल. यासाठी मंगळवारी (दि. २५) रात्री उशिरा बस पाठविण्यात आली आहे. दरोड्यात लंपास केलेला बहुतांश ऐवज परत मिळवण्यात यश प्राप्त मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सर्वजण हिस्ट्रीशीटर
ताब्यात घेतलेले सर्व संशयित हिस्ट्रीशीटर असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. ताब्यात घेतलेल्या या संशयितांना गोव्यात आणण्यात येत आहे. त्यामुळे नंतर त्यांच्या चौकशीतून राज्यात ठिकठिकाणी झालेल्या चोऱ्यांचा छडा लागू शकेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
गाड्यावरून काम सोडून गेला...
सागर यांचे आइस्क्रीम पार्लर असून चामुंडी आर्केडनजीकच त्यांचा एक गाडा आहे. हा गाडा समोसा, बर्गर आदी खाद्यपदार्थ विक्रीचा आहे. काही वर्षापूर्वी गाड्यावर ओडिशातील एक तरुण कूक म्हणून कामाला होता. तो वर्षापूर्वी काम सोडून गेला होता. याचा दरोड्यात हात असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. ताब्यात घेतलेल्या सहाजणांत त्याचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरोड्यात त्याचा कितपत सहभाग आहे, हे लवकरच उघड होईल असे पोलिसांनी सांगितले. हा तरुण काहीकाळ गाड्यावर काम करून नंतर गायब झाला. त्याच्या माध्यमातून काहीजण गोव्यात आले होते. त्यापैकी काहींनी सागर यांच्या फ्लॅटमध्ये दरोडा घातला असा संशय पोलिसांना आहे.
Web Summary : Six suspects are arrested in the Baina robbery case, some from Odisha and others from Mumbai. Police recovered stolen gold. A former worker is suspected as the mastermind. Investigations continue to reveal more details.
Web Summary : बायणा डकैती मामले में छह संदिग्ध गिरफ्तार, कुछ ओडिशा से, कुछ मुंबई से। पुलिस ने चुराया हुआ सोना बरामद किया। एक पूर्व कर्मचारी पर मास्टरमाइंड होने का संदेह है। आगे की जानकारी के लिए जाँच जारी है।