बाबूशचा बंगला होणार जमीनदोस्त
By Admin | Updated: April 5, 2015 01:17 IST2015-04-05T01:15:37+5:302015-04-05T01:17:16+5:30
सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचा मिरामार येथील बहुचर्चित बंगला लवकरच जमीनदोस्त होणार आहे, असे कुणाला सांगितले

बाबूशचा बंगला होणार जमीनदोस्त
सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचा मिरामार येथील बहुचर्चित बंगला लवकरच जमीनदोस्त होणार आहे, असे कुणाला सांगितले तर खरे वाटेल काय? अगदी नवा कोरा व मिरामार किनाऱ्याला पाहत रस्त्याच्या एका बाजूने उंच उभा असलेला हा बंगला बाबूश स्वत:च जमीनदोस्त करणार असून तिथे सुमारे २ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत चार तारांकित हॉटेल उभे राहणार आहे.
काही वर्षांपूर्वी मोन्सेरात यांनी आपल्या समर्थकांसह पणजी पोलीस स्थानकावर हल्ला करण्याची घटना घडली. त्या वेळी पोलिसांकडून याच बंगल्यात तोडफोड करण्यात आली होती. तीन-चार मजल्यांचा हा बंगला अतिशय पॉश आहे. सुमारे पस्तीस कोटी रुपयांना तो विक्रीसाठी काढला गेला असल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती. तथापि, ती चर्चा आता बंद झाली आहे. हा बंगला पाडून म्हणजे पूर्णपणे जमीनदोस्त करून तिथे हॉटेल बांधण्याची योजना मोन्सेरात यांच्या कंपनीने आखली असल्याची माहिती मिळाली. या बंगल्याच्या मागे मोन्सेरात यांचे एक छोटे हॉटेल आहे. तेही पाडले जाणार आहे. त्यामुळे सुमारे २ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा उपलब्ध होणार आहे.
मिरामार परिसरात सध्या जमिनीचा भाव एक लाख रुपये प्रति चौरस मीटर असा आहे. मोन्सेरात यांचे मिरामार-दोनापावल रस्त्याच्या बाजूने विज्ञान केंद्राच्या परिसरात एक मोठे हॉटेल उभे राहिले आहे. गेल्या वर्षी या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. त्याच पद्धतीचे दुसरे मोठे हॉटेल ते आपला बंगला पाडून तिथे उभे करू पाहात आहेत. मोन्सेरात यांना या विषयी विचारले असता, त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला. बंगला पाडून हॉटेल बांधणे आपल्याला व्यावसायिकदृष्ट्या योग्य वाटत असल्याचे मोन्सेरात यांचे म्हणणे आहे.
सद्गुरू पाटील ल्ल पणजी