काँग्रेसमध्ये तिकिटांचा लिलाव

By Admin | Updated: December 18, 2015 01:55 IST2015-12-18T01:55:42+5:302015-12-18T01:55:56+5:30

पणजी : गोव्यातील काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना जवळ असलेल्या काही व्यक्तींनी मिळून तिकिटांचा

Auction of tickets in Congress | काँग्रेसमध्ये तिकिटांचा लिलाव

काँग्रेसमध्ये तिकिटांचा लिलाव

पणजी : गोव्यातील काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना जवळ असलेल्या काही व्यक्तींनी मिळून तिकिटांचा लिलाव सुरू केला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबी बागकर यांनी गुरुवारी ‘बॉम्बगोळा’च टाकला.
आमच्या काँग्रेस पक्षाला १२५ वर्षांची परंपरा आहे. मात्र, गेले काही महिने गोव्यातील काँग्रेस पक्ष सोशल क्लब होण्याच्याच मार्गावर चालला आहे. पक्षात कुणीही सोमेगोमे येतात व सचिवांसारखी महत्त्वाची पदे मिळवितात आणि मनाला वाटते तेव्हा पक्ष सोडून जातात. याबाबत प्रदेश काँग्रेस समितीला विश्वासातच घेतले जात नाही, ही गोष्ट पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने माझ्या मनाला टोचते, असे बागकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सध्या डिचोली व मांद्रेतील आरएसएसच्या लोकांना काँग्रेसमध्ये आणून सचिवांसारखी पदे देत आहेत. प्रदेशाध्यक्ष एकाधिकारशाही पद्धतीने कार्यरत असल्याने पूर्ण प्रदेश काँग्रेस समिती खूप नाराज आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व त्यांच्या जवळच्या काही व्यक्तींनी तिकिटांचा लिलाव सुरू केला आहे. काँग्रेसमधील काहीजण भाजपशी व मुख्यमंत्र्यांशी ‘मॅच फिक्सिंग’ करत असून मी हा विषय तातडीने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासमोर मांडीन. मी आमच्या काँग्रेसला सोशल क्लब बनू देणार नाही, असे बागकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Auction of tickets in Congress