लष्कर जमीन देण्यास तयार
By Admin | Updated: February 24, 2016 02:38 IST2016-02-24T02:37:02+5:302016-02-24T02:38:39+5:30
पणजी : राजधानी पणजीतील काही जागा महापालिकेस देण्यासाठी लष्कर तयार झाले आहे. लष्कराने तसे पत्र महापालिकेस पाठवले

लष्कर जमीन देण्यास तयार
पणजी : राजधानी पणजीतील काही जागा महापालिकेस देण्यासाठी लष्कर तयार झाले आहे. लष्कराने तसे पत्र महापालिकेस पाठवले असून महापालिकेने हा विषय सरकारकडे सोपविला आहे, असे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी मंगळवारी येथे सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या उपस्थितीत कुंकळयेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. कुंकळयेकर यांना आमदार म्हणून कारकिर्दीचे एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांनी आपले प्रगती पुस्तक मंगळवारी जाहीर केले. आपण जाहीरनाम्यातून पणजीच्या पोटनिवडणुकीवेळी पणजीवासीयांनी जी आश्वासने दिली होती, त्यापैकी ८० टक्के आश्वासने मार्गी लागली. काही कामे पूर्णही झाली आहेत. पणजीत कुणाला तातडीने वैद्यकीय उपचार हवे झाले, तर कांपाल येथील मिलिटरी इस्पितळातही अशा रुग्णास जाता येईल. हे इस्पितळ त्यासाठी लष्कराने खुले केले असल्याचे कुंकळयेकर यांनी सांगितले. लष्कर पणजीतील काही जागा देण्यास तयार झाले आहे, असेही ते म्हणाले.
मांडवी नदीवर तिसऱ्या पुलाचे काम जोरात सुरू आहे. पर्र्वरीच्या बाजूने नियोजित वेळापत्रकानुसार काम सुरू असून मेरशीच्या बाजूने कामावर परिणाम झाला आहे; कारण त्या बाजूला खारफुटी असल्याने विषय राष्ट्रीय हरित लवादाकडे पोहचला आहे. लवादाच्या अपेक्षेनुसार कदाचित यापुढे मेरशीच्या बाजूने पुलाचे डिझाईन बदललेही जाऊ शकते, असे कुंकळयेकर यांनी सांगितले. रायबंदरच्या भागात ११ कोटी रुपये खर्चून भूमिगत वीजवाहिन्या टाकल्या जातील. त्या कामाची निविदा जारी करण्यात आली आहे. कांपाल येथे फुटबॉल स्टेडियम बांधण्यासाठीही निविदा जारी करण्यात आली आहे. पर्यटन विकास महामंडळाकडून बोक द व्हाक येथील तळ््याचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. येथील हिरा पेट्रोल पंपच्या मागे सुक्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी प्रकल्प उभारण्याचे काम जोरात सुरू आहे, असे कुंकळयेकर यांनी सांगितले. सांतइनेज येथील खाडीवर दोन्ही बाजूला बॅरिकेड्स घालण्याचा विचार आहे. पणजीत एकमार्गी वाहतूक व्यवस्था ९५ टक्के यशस्वी ठरली, असेही ते म्हणाले.
(खास प्रतिनिधी)