मंत्रिपदाची कल्पना आर्लेकर यांनी आईला दिली होती
By Admin | Updated: October 3, 2015 03:35 IST2015-10-03T03:35:27+5:302015-10-03T03:35:40+5:30
पणजी : मंत्री म्हणून आपला लवकरच शपथविधी होणार आहे, अशी कल्पना पंधरा ते वीस दिवसांपूर्वी राजेंद्र आर्लेकर यांनी

मंत्रिपदाची कल्पना आर्लेकर यांनी आईला दिली होती
पणजी : मंत्री म्हणून आपला लवकरच शपथविधी होणार आहे, अशी कल्पना पंधरा ते वीस दिवसांपूर्वी राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांच्या मातोश्री स्व. तिलोत्तमा आर्लेकर यांना दिली होती.
पेडणेचे आमदार असलेले आर्लेकर यांचा गुरुवारी सायंकाळी मंत्री म्हणून शपथविधी झाला. आर्लेकर यांची आई आता हयात नाही. त्यांचे निधन झाल्यास शुक्रवारी तेरा दिवस झाले. आर्लेकर यांना गेल्या महिन्यात संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिल्लीस बोलावून घेतले होते. तेव्हाच त्यांचे मंत्रिपद निश्चित झाले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही ते भेटले होते.
आर्लेकर मंत्री होतील, हे वीस दिवसांपूर्वी पूर्णपणे निश्चित झाले होते. आर्लेकर यांनी त्या वेळी आईला मंत्रिपदाची थोडी कल्पना दिली होती. त्यांना आनंद झाला होता. आपण राजभवनवर शपथविधीसाठी येईन, असे आर्लेकर यांच्या आईने आर्लेकर यांना सांगितले होते. मात्र, आईचे काही दिवसांनी निधन झाले.
चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता, तर आर्लेकर यांच्या आईला शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहता आले असते.
दरम्यान, आर्लेकर हे शुक्रवारी पणजीतील एका वृत्तवाहिनीच्या वर्धापनदिन सोहळ्यास आले होते. त्यानिमित्तच्या चहापानावेळी अनौपचारिकपणे बोलताना आर्लेकर यांनी काही हृद्य आठवणींना उजाळा दिला. आपली आई आमोणे गावची. ती शिकलेली नव्हती. तिला काहीच लिहिता येत नव्हते; पण घरी येणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील सर्व लोकांचे तिने मनापासून आगतस्वागत केले. संघाचे जे लोक घरी येतात, ते लोक चांगले आहेत हे तिच्या लक्षात यायचे, असे आर्लेकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)