लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'माझे घर' योजने अंतर्गत १९७२ पूर्वीची सर्व घरे कायदेशीर करण्यासाठी सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरू होणार असून अर्ज उपलब्ध करण्यात येतील. त्यामुळे गोमंतकीयांनी या योजनेचा लाभघेण्यासाठी आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सोमवारी पाळी-कोळंबी पंचायतीच्या पाच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या नूतन इमारतीच्या पायाभरणी सोहळ्यानंतर ते बोलत होते. व्यासपीठावर सरपंच संतोष नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लीकर, गट विकास अधिकारी, पंच निशा नाईक, आशा गवळी, गणेश पाटवळकर, दीपक नाईक, शिवदास मूळगावकर, प्रशिला गावडे, प्रसाद सावंत, गौरांगी परब, सरपंच रोहिदास कानसेकर, कालिदास गावस यांच्यासह विविध पंचायतींचे सरपंच, पंच सदस्य व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारने घरासंदर्भात घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून त्याची पूर्तता करण्यासाठी सर्वानी सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. साखळी मतदारसंघात सहा पंचायत इमारतीच्या कामांची पूर्तता झाली. पाळी पंचायतीच्या इमारत उभारणीला जमिनीच्या अडचणीमुळे विलंब झाला असला तरी आता जमीन मिळाल्याने वर्षभरात ती उभी होईल. ही इमारत दोन मजली आहे.
खालच्या मजल्यावर दुकान गाळे, पहिल्या मजल्यावर कार्यालय तर दुसऱ्या मजल्यावर सभागृह असेल. त्याची योग्य निगा राखा व गावासाठी त्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन सावंत यांनी केले. यावेळी सरपंच संतोष नाईक यांनी अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने आनंद व्यक्त केला.
नीट व जेईईबाबत विशेष मार्गदर्शन सेल सुरू करणार
काही शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य करिअर मार्गदर्शनात कमी पडतात. गेल्या तीन वर्षात अभियांत्रिकी विभागातील अंदाजे ३० टक्के जागा रिकाम्या राहिल्याची खंत व्यक्त करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या पुढे नीट तसेच जेईईबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष सेल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा साखळी येथे केली. मुलांना योग्य वयात करिअरबाबत मार्गदर्शन न मिळाल्यास त्याचे पुढे जाऊन गंभीर परिणाम सोसावे लागतात. आज रोजगाराच्या अनेक संधी आहेत. मात्र अनेक विद्यार्थ्यांना त्याची माहितीच नाही, म्हणूनच करिअरबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष सेल सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कचरा टाकणाऱ्यांना दहा हजारांचा दंड
मुख्यमंत्री सावंत यांनी नावेली पंचायत क्षेत्रात कचरा शेड व सभागृहाचे उद्घाटन केले. त्यावेळी लोकांची मानसिकता अजून सुधारलेली नसून लोक आपला कचरा रस्त्यावर टाकत असल्याचे दिसून येते. मात्र आता नवा कायदा लागू झाला असून सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकताना कोणी दिसल्यास त्याला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असेही ते म्हणाले.
सामोपचारानेच जागेचा वाद मिटवा
गाव पातळीवर काम करणाऱ्या विविध संस्था, संघटना, समित्यांनी गावच्या विकासात योगदान द्यावे. तसेच सरकार राबवत असलेल्या उपक्रमांना पाठिंबा द्यावा. 'माझे घर' योजना ही गोमंतकीयांच्या हिताची आहे. घरे कायम करण्याची प्रक्रिया करताना ग्रामस्थांनी वाद-विवाद न करता, न्यायालयात न जाता आपापसात सामोपचाराने वाद मिटवावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.