‘बेटी बचाओ’साठी उत्तर गोव्याची निवड
By Admin | Updated: October 8, 2014 01:27 IST2014-10-08T01:27:22+5:302014-10-08T01:27:56+5:30
पणजी : राज्यात २0१३ साली एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९२६ असल्याच्या अहवालानंतर उत्तर गोवा जिल्ह्याची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानासाठी निवड झाली आहे.

‘बेटी बचाओ’साठी उत्तर गोव्याची निवड
पणजी : राज्यात २0१३ साली एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९२६ असल्याच्या अहवालानंतर उत्तर गोवा जिल्ह्याची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानासाठी निवड झाली आहे. या अभियानाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी महिला व बाल कल्याण खात्याला केंद्राकडून दीड कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार आहे.
स्त्री भू्रणहत्या थांबावी, तसेच मुलींना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी देशातील १00 जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारने १00 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेंतर्गत सर्वेक्षण आणि जागृती कार्य करणाऱ्या प्रतिनिधींनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, एक हजार मुलांमागे मुलींची संख्या सर्वांत कमी दमण येथे आढळली, तर गुजरात येथे ७00, दिल्ली येथे ८५६, अशी दिसून आली. उत्तर गोव्यात एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९२६ आढळली. यंदा २0१४ साली त्यात वाढ होऊन ती ९३९ झाल्याचे महिला व बाल कल्याण खात्यातील सूत्रांनी सांगितले.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत काही राज्यांत आजही स्त्री भ्रूणहत्येचे विदारक चित्र पाहायला मिळते. यात भारताची राजधानी दिल्लीचाही समावेश आहे. बिहार, झारखंड येथेही बऱ्याच प्रमाणात स्त्री भ्रूणहत्या होत असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. काही राज्यांतील अनाथाश्रमात मुलांची संख्या मोठी आहे. यात मुलींचे प्रमाणही जास्त असल्याचे आढळते. महाराष्ट्रातील काही भागांचा यात समावेश आहे. सर्वेक्षणांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, काही पालक मुलीच्या जन्मानंतर तिला अनाथाश्रमात सोडतात. बिहार, झारखंड येथील भागात तर मुली हरवण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. बऱ्याच वेळा पालकच मुलींना मुद्दाम सोडून देतात.
‘ट्रॅक चाईल्ड डॉट कॉम’ या बेवसाईटवर अशा सापडलेल्या अनेक मुलांविषयी माहिती आहे.
राज्यात सध्या दोन मुले बेपत्ता आहेत, तर विविध बाल संगोपन केंद्रांत सुमारे १५00 मुले आहेत. राज्यात एकूण ६१ बाल संगोपन केंद्रे असून यातील ४६ केंद्रे महिला व बाल कल्याण खात्यांतर्गत नोंदणीकृत आहेत. महाराष्ट्र राज्यातील ३५७९ मुले बेपत्ता आहेत. तेथील बाल संगोपन केंद्रांत साधारण १६ हजार ९९१ मुले आहेत.
(प्रतिनिधी)