अपघाताचा पंचनामा करतानाच दुसरा अपघात; पोलिसांच्याच गाडीला दिली ठोकर
By वासुदेव.पागी | Updated: December 26, 2023 15:14 IST2023-12-26T15:14:00+5:302023-12-26T15:14:43+5:30
दोन अपघातात चार गाड्यांची मोडतोड झाली आहे.

अपघाताचा पंचनामा करतानाच दुसरा अपघात; पोलिसांच्याच गाडीला दिली ठोकर
पणजी: राज्यात अपघातांची शृंखलात चालूच ठेवताना बांबोळी येथे मंगळवारी सलग दोन अपघात झाले. पहिल्या अपघाताचा पंचनामा करीत असतानाच पोलिसांच्या गाडीला मागाहून सुसाट धावणाऱ्या स्कोडा गाडीने ठोकर दिली. त्यामुळे दोन अपघातात चार गाड्यांची मोडतोड झाली आहे.
बांबोळी महामार्गावर सकाळी झालेल्या पहिल्या अपघातात मालवाहू गाडीने इलेक्ट्रिक गाडीला धडक दिली .यात मालवाहू गाडीचा पुढील भाग आणि इलेक्ट्रिक गाडीचा मागील भागाची मोडतोड झाली आहे. या अपघाताची माहिती आगशी पोलिसांना दिल्यावर पोलीस या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आले. पंचनामा करीत असतानाच आगशीहून पणजीच्या दिशेने सुसाट आलेल्या स्कोडा गाडीने पोलिसांच्या गाडीला मागाहून धडक दिली. त्यामुळे स्कोडाची आणि पोलीस वाहनाची ही मोडतोड झाली आहे. या सलग दोन अपघातामुळे काही वेळ वाहतूकही खोळंबून पडली. नंतर क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला काढण्यात आली आणि वाहतुकीला वाट करून देण्यात आली.
या रस्त्यावर सोमवारी ही एक अपघात झाला होता. चालकाला अस्वस्थ वाटू लागल्याने हा अपघात झाला होता. सुदैवाने कालच्या अपघातात आणि आजच्या अपघातातही जीवित हानी झाली नाही. आजच्या अपघातात तिघे किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेऊन उपचार करण्यात आले.