खाणग्रस्त ट्रकचालक सरकारवर नाराज
By Admin | Updated: February 16, 2015 02:14 IST2015-02-16T02:11:36+5:302015-02-16T02:14:39+5:30
होंडा : खाण व्यवसायातील ट्रकचालकांना सरकारने सात महिन्यांपूर्वी दिलेले आश्वासन अजून पाळलेले नाही.

खाणग्रस्त ट्रकचालक सरकारवर नाराज
होंडा : खाण व्यवसायातील ट्रकचालकांना सरकारने सात महिन्यांपूर्वी दिलेले आश्वासन अजून पाळलेले नाही. त्यामुळे हे ट्रकचालक नाराज झाले असून रविवारी होंडा येथे झालेल्या बैठकीत सरकारला आणखी आठ दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुदतीत प्रश्न न सोडविल्यास येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीत सरकार पक्षाविरोधी भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सरकारने खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर ट्रकमालकांना आर्थिक मदत दिली, मात्र या ट्रकांवर चालक म्हणून काम करणाऱ्यांचा विचार केला नाही. त्यामुळे गेले ३० महिने ट्रकचालक हलाखीचे जीवन जगत आहेत. सात महिन्यांपूर्वी सरकारने विधानसभेत चालकांना मदत करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा करूनही मदत मिळत नसल्याने ट्रकचालक या निर्णयापर्यंत आले आहेत.
वडदेव मंदिरानजीक असलेल्या वटवृक्षाखाली झालेल्या सभेत खाणग्रस्त ट्रकचालक समितीचे अध्यक्ष विष्णू सावळ, सदस्य शंकर राजागोले, चंद्रकांत साखळकर, रामेश्वर परब यांच्यासह सुमारे १०० च्या आसपास चालक उपस्थित होते.
सावळ यांनी सात महिन्यांपासून केलेल्या कामाचा आढावा सादर केला. त्यानंतर सरकारने जर हा प्रश्न आठ दिवसांत निकालात न काढल्यास जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी सरकारविरोधी भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सावळ यांनी दिली. दरम्यान, खाणग्रस्त ट्रकचालकांची माहिती मिळविण्याचे काम समितीने सुरू केले आहे. अजून कोणी आपली माहिती दिली नसल्यास समिती सदस्याकडे द्यावी, असे शंकर राजागोले यांनी सांगितले. (वार्ताहर)