१0८ कर्मचाऱ्यांचे वेतन अडल्याने नाराजी
By Admin | Updated: September 22, 2015 00:49 IST2015-09-22T00:49:07+5:302015-09-22T00:49:17+5:30
पणजी : जीव्हीके इएमआरआय कंपनीच्या व्यवस्थापनाने १0८ रुग्णसेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन आणि पगारवाढ अजूनपर्यंत दिली नाही

१0८ कर्मचाऱ्यांचे वेतन अडल्याने नाराजी
पणजी : जीव्हीके इएमआरआय कंपनीच्या व्यवस्थापनाने १0८ रुग्णसेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन आणि पगारवाढ अजूनपर्यंत दिली नाही. याबाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधाला असता या प्रक्रियेसंदर्भातील कागदपत्रे (फाईल) सरकार दरबारी असून ती मंजूर न झाल्याने यंदा गोव्यातील कर्मचाऱ्यांना थकलेले वेतन देणे तसेच दरवर्षी चतुर्थीपूर्वी देण्यात येणारी पगारवाढ देणे शक्य झाले नसल्याचे सांगण्यात आले.
जीव्हीके इएमआरआय कंपनी गोवा राज्याबरोबरच इतर आठ राज्यांत सेवा पुरवते. येथील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतर सर्व राज्यांतील कर्मचाऱ्यांना चतुर्थीपूर्वीचे थकबाकी वेतन (एरियस) दिले गेले आहे. मात्र, गोव्यातील कर्मचाऱ्यांना थकबाकी देण्यात आली नाही. कंपनीने राज्यात १0८ सेवा सुरू केल्यापासून ते गतवर्षीपर्यंत चतुर्थीपूर्वी कर्मचाऱ्यांना थकबाकी दिली होती. मात्र, यंदा व्यवस्थापनाने कोणतीही सूचना न देता तसेच याबाबत १0८ कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी वारंवार कंपनीकडे चौकशी केल्यानंतरही कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता सरकारी प्रक्रियेबाबत मौन पाळले. कर्मचाऱ्यांना थकबाकी आणि पगारवाढ या दोन्ही गोष्टी का अडून राहिल्या आहेत याबाबत कोणतीही माहिती नसल्याने १0८ समितीच्या एका सदस्याने सांगितले.
या कंपनीअंतर्गत एकूण १९४ कर्मचारी काम करतात. जीव्हीके इएमआरआयच्या सेवा नियंत्रक प्रतिष्ठा मुद्रस म्हणाल्या की, कर्मचाऱ्यांची थकबाकी आणि पगारवाढीबाबतची प्रक्रिया सुरू आहे. सध्या ही फाईल सरकार दरबारी असून ती मंजूर होऊन येईपर्यंत आम्ही कर्मचाऱ्यांना थकबाकी वेतन आणि पगारवाढीबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. सरकारकडून हे सोपस्कार त्वरित पूर्ण व्हावेत म्हणून व्यवस्थान प्रयत्न करीत आहे.