गोवा विद्यापीठाविषयी नाराजी
By Admin | Updated: March 30, 2015 01:26 IST2015-03-30T01:23:17+5:302015-03-30T01:26:54+5:30
पणजी : गोवा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला

गोवा विद्यापीठाविषयी नाराजी
पणजी : गोवा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींकडून पाठिंबा मिळत आहे. विद्यापीठाच्या कॅण्टिनमध्ये घडणाऱ्या घटना आणि विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष यावर समाजातील विविध मान्यवरांनी नाराजीही व्यक्त केली.
गोवा विद्यापीठाच्या उपाहारगृह कंत्राटदाराकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनी जमिनीवर बसून भोजन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे ‘अ’ दर्जा प्राप्त असलेल्या विद्यापीठाच्या कॅण्टिन आणि सभोवताली परिसरात असलेली अस्वच्छता आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या गोष्टींच्या विरोधात डॉ. कामत यांनी ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. विद्यापीठाच्या प्राध्यापकांवर अशी जमिनीवर बसून भोजन करण्याची वेळ येणे आणि विद्यापीठ प्रशासनाने याविषयी कोणतीही दखल न घेणे ही घटना चीड आणणारी आहे, अशा प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतील लोक व्यक्त करत आहेत.
कॅण्टिनमध्ये चाललेल्या गैरव्यवहार आणि अनारोग्य व्यवस्थेविषयी डॉ. कामत यांनी कॅण्टिनच्या कंत्राटदाराला प्रश्न केला असता कंत्राटदाराने त्यांच्या विरोधात विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहिले. विद्यापीठ प्रशासनाने या समस्येकडे लक्ष पुरविण्याऐवजी कंत्राटदाराच्या पत्राची दखल घेत उलट डॉ. कामत यांनाच जाब विचारला. विद्यापीठाने घेतलेल्या या पवित्र्यामुळे समाजात संताप व्यक्त केला जात आहे. विद्यापीठाच्या कॅ ण्टिनमध्ये चाललेला प्रकार थांबविण्याऐवजी विद्यापीठ अशा प्रकारांना दुजोरा देत असल्यामुळे या समस्येकडे गंभीर प्रकारे पाहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. डॉ. कामत यांची मागणी आहे की, कंत्राटदाराने सादर केलेले बदनामीकारक पत्र मागे घेऊन लेखी माफी मागितली पाहिजे. नवीन शैक्षणिक वर्षापासून नवीन कंत्राटदार नेमून सध्या असलेल्या कंत्राटदाराला काढून टाकणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कॅण्टिनमध्ये अन्नपदार्थांचा दर्जा राखणे, साफसफाई करणे, किमतीप्रमाणे जेवण मिळणे आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
साहित्यिक दिलीप बोरकर यांनी सांगितले की, गोवा विद्यापीठाच्या कॅण्टिनमध्ये पाहिल्यास अस्वच्छता दृष्टीस पडते. डॉ. नंदकुमार कामत यांनी याविषयी आवाज उठवून अगदी योग्य केले आहे. कॅण्टिनच्या कारभारात भ्रष्टाचार असल्याने याविषयी कोणी ठोस पावले उचलत नाही. त्यामुळे डॉ. कामत यांची लढाई योग्य आहे आणि प्रत्येकाने त्यांना साथ दिली पाहिजे.
गोवा विद्यापीठाचे रिसर्च स्कॉलर युगांक नाईक यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या प्राध्यापकाने एका चांगल्या कारणासाठी आंदोलन सुरू केले आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. कॅण्टिनमध्ये अस्वच्छता आणि खाद्यपदार्थांचा दर्जा योग्य नसल्याने याची दखल घेणे आवश्यक आहे. त्यांच्या या आंदोलनाचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच होणार आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहाणे आवश्यक आहे.
(प्रतिनिधी)