अनंत शेट यांनाच मंत्रिपद
By Admin | Updated: July 10, 2015 01:39 IST2015-07-10T01:39:36+5:302015-07-10T01:39:38+5:30
मये मतदारसंघाचे आमदार तथा उपसभापती अनंत शेट यांना मंत्रिपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे डिचोली तालुक्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळणार आहे.

अनंत शेट यांनाच मंत्रिपद
सद्गुरू पाटील ल्ल पणजी
मये मतदारसंघाचे आमदार तथा उपसभापती अनंत शेट यांना मंत्रिपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे डिचोली तालुक्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळणार आहे.
विधानसभा अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करावा की नाही, हे निश्चित ठरलेले नाही; पण गणेश चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार निश्चितच होईल, असे संकेत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिले आहेत. अनंत शेट हे भाजपचे ज्येष्ठ आमदार आहेत. त्यामुळेच त्यांचे नाव मंत्रिपदासाठी निवडले आहे. साखळीचे आमदार प्रमोद सावंत किंवा सांत आंद्रेचे आमदार विष्णू वाघ यांना मंत्रिपद द्यावे, याविषयीची प्रश्नार्थक चर्चा गेल्या महिन्यात भाजपमध्ये होती. मात्र, ती दोन्ही नावे बाजूला ठेवून शेट यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सावंत व वाघ हे प्रथमच निवडून आलेले आमदार आहेत. नीलेश काब्राल, गणेश गावकर, सुभाष फळदेसाई, ग्लेन टिकलो, किरण कांदोळकर, मायकल लोबो, सुभाष ऊर्फ राजन नाईकही भाजपचे प्रथमच २०१२ साली निवडून आलेले आमदार आहेत.
डिचोली तालुक्यात डिचोलीसह साखळी व मये मतदारसंघ येतात; पण डिचोली तालुक्याला भाजपच्या मंत्रिमंडळात सध्या प्रतिनिधित्व नाही. तीनपैकी दोन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. डिचोली मतदारसंघ हा अपक्ष आमदार नरेश सावळ यांच्याकडे आहे. डिचोलीच्या अगदी शेजारील सत्तरी तालुक्यातील दोन्ही मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने सत्तरीला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्याचा प्रश्नच येत नाही. शेट सध्या उपसभापती आहेत. त्यांना मंत्रिपद दिल्यानंतर वाघ किंवा सावंत यांना उपसभापतीपद दिले जाऊ शकते. तुरुंगात असलेले गोवा विकास पक्षाचे नुवेचे आमदार मिकी पाशेको यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर मंत्रिमंडळात एक जागा रिकामी झाली.