३० लाखांचा आॅनलाईन गंडा

By Admin | Updated: September 23, 2014 02:22 IST2014-09-23T02:16:44+5:302014-09-23T02:22:03+5:30

एनआरआयला भामट्यांचा हिसका : अमेरिकेत नोकरीचे आमिष

Analyze 30 lakhs online | ३० लाखांचा आॅनलाईन गंडा

३० लाखांचा आॅनलाईन गंडा

पणजी : दरमहा लाख रुपये पगाराचे आमिष दाखवून शापोरा येथील गृहस्थाला ३० लाख रुपयांना गंडविण्याचा प्रकार घडला आहे. सायबर गुन्हेगारांच्या कारवायांना बळी पडलेला हा गृहस्थ विदेशात काम करत होता.
प्रवीण नार्वेकर असे त्याचे नाव असून तो अफगाणिस्तानमध्ये नोकरी करत होता. हल्लीच तो गोव्यात परतला होता. दोन महिन्यांपूर्वी त्याला अमेरिकेत एका बढ्या कंपनीत विक्री व्यवस्थापक म्हणून नोकरीची आॅफर असल्याची माहिती देणारा ई-मेल आला होता. पगार दरमहा सव्वालाख रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या ई-मेलला त्याने आॅफर स्वीकारल्याचे उत्तर दिले. त्यानंतर त्याला पुन्हा सविस्तर माहिती मागणारा दुसरा ई-मेल आला. माहिती दिल्यानंतर ई-मेलकर्त्याने त्याला आपला संपर्क क्रमांकही पाठविला. नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यापूर्वी संशयिताला ३० लाख रुपये भरण्याची सूचना ई-मेलकर्त्याने केली. हे पैसे अनामत रक्कम म्हणून ठेवली जाईल. एकदा कामावर रुजू झाल्यावर ती परत केली जाईल, असे ई-मेलमध्ये सांगण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून प्रवीणने ३० लाख रुपये ई-मेलकर्त्याने दिलेल्या बँक खात्यात जमा केले. हे पैसे त्याने हप्त्याहप्त्याने आणि दीड महिन्यांच्या काळात जमा केले, अशी माहिती त्याने सायबर विभागाला लिहिलेल्या तक्रारीत दिली आहे.
पैसे जमा करून झाल्यावर ई-मेलकर्त्याने पुन्हा प्रवीणला संपर्क केलाच नाही. पाठविलेल्या ई-मेलनाही उत्तरे दिली नाहीत. तसेच फोन क्रमांकवरूनही संपर्क झाला नाही. त्यामुळे आपल्याला फसविले गेल्याचे प्रवीणला समजले. त्यानंतर त्याने सायबर विभागाकडे तक्रार नोंदविली. सायबर विभागाने भारतीय दंडसंहिता कलम ४२०, ४६८ (३४) व महिती तंत्रज्ञान कायदा २०००च्या ६६ कलमांखाली गुन्हा नोंदविला आहे. निरीक्षक राजेश जॉब या प्रकरणात तपास करत आहेत.
आयुष्यभराची कमाई गेली
आॅनलाईन आॅफरवर विश्वास ठेवल्यामुळे आयुष्यभराची कमाई घालवून बसण्याची पाळी प्रवीणवर आली आहे. आॅनलाईन घोटाळ्यांविषयी प्रवीणने ऐकले होते; परंतु आपलाही असा विश्वासघात होईल, असे त्याला वाटले नव्हते. तो अफगाणिस्तानमध्ये चांगल्या पदावर कामाला होता व हल्लीच गोव्यात आला होता. त्याने घालविलेल्या ३० लाख रुपयांतील काही पैसे त्याचे स्वत:चे होते, तर काही पैसे मित्र व इतरांकडून घेतले होते.

Web Title: Analyze 30 lakhs online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.