कारे महाविद्यालयातील २२ जागा भरण्यास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 02:23 IST2016-07-05T02:20:03+5:302016-07-05T02:23:44+5:30
पणजी : कारे महाविद्यालयात एलएलबी पदवी अभ्याक्रमासाठी यंदा कमी करण्यात आलेल्या २२ जागा भरण्यासाठी महाविद्यालयाला

कारे महाविद्यालयातील २२ जागा भरण्यास परवानगी
पणजी : कारे महाविद्यालयात एलएलबी पदवी अभ्याक्रमासाठी यंदा कमी करण्यात आलेल्या २२ जागा भरण्यासाठी महाविद्यालयाला परवानगी देण्याचा निर्णय सोमवारी गोवा विद्यापीठाच्या शैक्षणिक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती गोवा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. वाय. व्ही. रेड्डी यांनी दिली.
येत्या ८ दिवसांत कारे महाविद्यालयात या २२ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून या जागांसाठी प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी दक्ष राहावे, असे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे राज्य समितीचे उपाध्यक्ष आत्माराम बर्वे यांनी सांगितले.
सोमवारी बैठकीनंतर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी कुलसचिवांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी कारे महाविद्यालयाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला असल्याचे सांगितले.
कारे महाविद्यालयात एलएलबी पदवी अभ्यासक्रमासाठी ६० जागा उपलब्ध आहेत. मात्र, प्रवेश परीक्षा घेतल्यानंतर केवळ ३८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय महाविद्यालयाने घेतला. या महाविद्यालयाकडून २०१५-१६ मध्ये २२ जागा जास्त भरल्या होत्या; त्यामुळे यंदा त्यांना २२ जागा कमी करण्याचा दंड गोवा विद्यापीठातर्फे देण्यात आला होता.
महाविद्यालयाच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना भोगावी लागत असल्याने भारतीय जनता पक्ष युवा मोर्चातर्फे या अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांना घेऊन गेल्या आठवड्यात विद्यापीठावर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी भाजयुमोचे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ यांनी कुलगुरू डॉ. सतीश शेट्ये यांची भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी सोमवारी घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक मंडळाच्या बैठकीत या विषयावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. (प्रतिनिधी)