‘दारू ही गोव्याची संस्कृती नव्हे’
By Admin | Updated: August 24, 2014 00:50 IST2014-08-24T00:46:19+5:302014-08-24T00:50:09+5:30
पणजी : दारू पिणे हा गोव्याच्या संस्कृतीचा भाग आहे, अशा प्रकारचे विधान भाजपचे प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी केल्यानंतर राज्यातील विविध घटकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

‘दारू ही गोव्याची संस्कृती नव्हे’
पणजी : दारू पिणे हा गोव्याच्या संस्कृतीचा भाग आहे, अशा प्रकारचे विधान भाजपचे प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी केल्यानंतर राज्यातील विविध घटकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विशेषत: महिला वर्गात अधिक संताप व्यक्त होत आहे. भाजपमध्येही मिस्किता यांच्या विधानाने खळबळ माजली आहे. दारू संस्कृती ही कधीच गोव्याची संस्कृती होऊ शकत नाही, असे मत भाजपमधीलही अनेकजण व्यक्त करत आहेत. मगोचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी भाजप प्रवक्त्याची ही भूमिका अमान्य केली आहे.
भाजपचे कार्यकर्ते असलेले गोवंश रक्षा अभियानच्या गोवा शाखेचे अध्यक्ष हनुमंत परब म्हणाले की, गोमंतकीय हिंदू समाजाच्या लग्न सोहळ्यांमध्ये कधीच दारू पिली जात नाही. भारतीय संस्कृतीने दारू निषिद्ध मानली आहे. मिस्किता यांनी हिंदू विवाह सोहळे कधी पाहिलेले नसतील. त्यांनी केलेले विधान दु:खद आणि अत्यंत धक्कादायक आहे.
परब म्हणाले, देश, धर्म, संस्कृतीच्या रक्षणाच्या गोष्टी बोलणाऱ्या भाजपमधील एक प्रवक्ता दारू पिणे ही गोव्याची संस्कृती आहे असे म्हणतो, याबाबत पक्षाने स्पष्टीकरण करायला हवे.
डिचोलीचे आमदार नरेश सावळ म्हणाले की, भाजपचे प्रवक्ते गोव्याची खरी संस्कृती विसरले. दारू ढोसणे हे व्यसन आहे, ती गोव्याची संस्कृती होऊ शकत नाही. आणखी दहा वर्षे जर कॅसिनो जुगार मांडवीत कायम राहिला तर कॅसिनो हीच गोव्याची संस्कृती, असेही भाजपचे नेते म्हणतील. सत्तेवर आल्यापासून भाजपचे काय झाले ते कळत नाही.
(खास प्रतिनिधी)