एम्सचे अधिकारी, कन्सल्टंट आज गोव्यात
By Admin | Updated: April 13, 2015 01:18 IST2015-04-13T01:18:33+5:302015-04-13T01:18:45+5:30
पणजी : गोमेकॉत १५0 कोटींच्या सुपरस्पेशालिटी ब्लॉकबाबत चर्चेसाठी केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी गोव्यात येत आहे. आॅल इंडिया

एम्सचे अधिकारी, कन्सल्टंट आज गोव्यात
पणजी : गोमेकॉत १५0 कोटींच्या सुपरस्पेशालिटी ब्लॉकबाबत चर्चेसाठी केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी गोव्यात येत आहे. आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे (एम्स) भोपाळ येथील अधिकारी, पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेचे अधिकारी तसेच कन्सल्टंट येणार असून दोन दिवस ते गोव्यात असतील.
आरोग्यमंत्री या नात्याने बोलताना उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा म्हणाले की, केंद्र सरकारने वरील निधी मंजूर केलेला आहे. या ब्लॉकमध्ये कोणत्या सुविधा असाव्यात, तसेच कोणते निकष असावेत याबाबत चर्चा केली जाईल. कन्सल्टंट या ब्लॉकचे डिझाईन ठरवतील. सध्याच्या सुपरस्पेशालिटी विभागाचे अध्यापन विभागात रूपांतर केले जाईल. सध्या या विभागात युरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, न्युरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी व प्लास्टिक सर्जरी हे विभाग चालतात. न्युरो सर्जरीच्या बाबतीतच अध्यापनाची सोय आहे, इतर बाबतीत ती नाही. नवा सुपरस्पेशालिटी ब्लॉक झाल्यानंतर सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करता येतील.
स्वाईन फ्लू : एकूण ४६ पॉझिटिव्ह
स्वाईन फ्लूच्या बाबतीत डिसोझा यांनी अशी माहिती दिली की, साथ आल्यापासून आजपावेतो संशयित रुग्णांच्या थुंकीचे २0७ नमुने तपासणीसाठी पाठवले. त्यातील २0१ जणांचा अहवाल आला असून ४६ पॉझिटिव्ह प्रकरणे आढळली आहेत. ४६ पैकी बहुतांश या आजारातून बरे झाले आहेत. गोमेकॉ, आझिलो किंवा हॉस्पिसिओत सध्या कोणीही उपचारासाठी नाहीत. नमुने आता मणिपालला तपासणीसाठी पाठवले जात आहेत. (प्रतिनिधी)