हार्वर्ड विद्यापीठाशी झालेला करार गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त; मुख्यमंत्र्यांनी दिली डॉ. विजय दर्डा यांना माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2025 08:20 IST2025-01-12T08:19:28+5:302025-01-12T08:20:56+5:30
पर्यटनाबाबतही चर्चा

हार्वर्ड विद्यापीठाशी झालेला करार गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त; मुख्यमंत्र्यांनी दिली डॉ. विजय दर्डा यांना माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : हार्वर्ड विद्यापीठाशी गोवा सरकारचा झालेला समझोता करार हा गोव्यातील महाविद्यालयीन व अन्य स्तरांवरील विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कराराविषयी 'लोकमत' माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांना सविस्तर माहिती दिली.
दर्डा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेतली. विविध विषयांवर उभयतांमध्ये तासभर चर्चा झाली. शिक्षणक्षेत्रात विविध स्तरांवर गोवा सरकार खूप चांगले उपक्रम राबवत आहे. नवे प्रयोग करीत आहे. त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी दर्डा यांना माहिती दिली.
नेतृत्व विकासासाठी विद्यार्थ्यांना ठरेल उपयुक्त
गोव्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी नुकताच सरकारने हार्वर्ड विद्यापीठाशी करार केला आहे. हार्वर्डशी केलेली भागीदारी शैक्षणिक उत्कृष्टता आणि नेतृत्व विकास याबाबत गोमंतकीय विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. हार्वर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी, शिक्षकांची भूमिका पार पाडतील आणि गोव्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी 'प्रशिक्षक फेलो' म्हणून काम करतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या करारामुळे विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक व शैक्षणिक स्तर निश्चितच उंचावला जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी राज्यातील इतर चालू घडामोडींबाबत काहीवेळ चर्चा झाली.
दर्डा यांच्याकडून उपक्रमांचे कौतुक
गोव्यातील उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी, जे कार्यक्रमांचे प्राथमिक लाभार्थी म्हणून या करारानुसार सहभागी होतील. कोणताच विद्यार्थी शिकण्याच्या संधीपासून दूर राहू नये, असा गोवा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच हे उपक्रम व विविध करार केले जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. विजय दर्डा यांनी गोवा सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत केले, कौतुक केले. पर्यटन क्षेत्रातही गोव्याने जी चांगली पावले उचलली आहेत, त्यांचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.