म्हापसा सबयार्डमध्ये अग्नितांडवबार्देस
By Admin | Updated: December 6, 2015 01:40 IST2015-12-06T01:40:24+5:302015-12-06T01:40:35+5:30
म्हापसा येथील सबयार्डमध्ये शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बांबूपासून बनवलेल्या डाळ्या, सूप, टोपल्या व

म्हापसा सबयार्डमध्ये अग्नितांडवबार्देस
म्हापसा येथील सबयार्डमध्ये शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बांबूपासून बनवलेल्या डाळ्या, सूप, टोपल्या व लग्नसराईसाठी लागणाऱ्या वस्तू व दी म्हापसा मर्चंट को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे एक वातानुकूलन यंत्र मिळून सुमारे १५ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.
दर दिवशी या सबयार्डमध्ये बांबूपासून बनविलेल्या वेगवेगळ्या वस्तू घेऊन गोव्यातील ग्रामीण भागातून तसेच दोडामार्ग व इतर जवळच्या भागातून विक्रेते येतात व रात्रीच्या वेळी जाताना जवळच असलेल्या दी म्हापसा मर्चंट को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बाजूला ठेवतात. शुक्रवारच्या बाजाराच्या दिवशी हा माल मोठ्या प्रमाणात आणला जातो. कालच शुक्रवारचा बाजार होता. हा माल नेहमीप्रमाणे आणून ठेवला होता. त्याला शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने सर्वत्र हाहाकार उडाला.
काहींनी म्हापसा अग्निशामक दलाला याची माहिती देताच दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांच्यासह हनुमंत हळदणकर, एम. एस. राऊत, प्रमोद गवंडी, व्ही. एस. राणे, प्रकाश घाडी, पी. एस. गावकर, यशवंत नाईक, प्रमोद महाले, फटजी गावकर, शिवाजीराव राणे, रूपेश गावस, दिप्तेश पै, एस. व्ही. तानावडे, मालू पावणे यांनी घटनास्थळी म्हापसातून तीन पाण्याचे बंब व पिळर्ण येथून एक पाण्याचा बंब मिळून चार बंब वापरून आग विझविली. ही आग त्वरित विझविली नसती, तर घटनास्थळी रांगेत असलेली सर्व दुकाने जळून खाक झाली असती आणि त्यात कोट्यवधींचे नुकसान झाले असते.
दरम्यान, येथे असलेल्या दी म्हापसा मर्चंट को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअमरन व व्यापारी मनोज वाळके यांनी सांगितले की, आग लागल्याची माहिती म्हापसा अग्निशामक दलाला दिली; पण ते तत्काळ आले नाहीत. एका व्यक्तीला त्यांच्या कार्यालयात पाठवून त्यांना बोलावून घ्यावे लागले. दोन दिवसांपूर्वी कुणी तरी म्हापसा यार्डात आग लागणार, असे म्हणाला होता. त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी आग लागली त्या व्यापाऱ्यांचे किमान सात ते आठ लाखांचे नुकसान झाले. तर आमच्या बॅँकेची वातानुकूलन यंत्रणा जळून एक लाखाचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले.
म्हापसा व्यापारी संघटनेचे खजिनदार रामा ऊर्फ भाऊ राऊळ यांनी सांगितले की, येथील विजेच्या वायर खराब झालेल्या आहेत. तसेच येथे कोणतीही सुविधा नाही. या आगीत या मालाच्या विक्रेत्यांचे सुमारे १५ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला, तर म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांनी या आगीत २ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आणि ८ लाखांचे साहित्य वाचविल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)